मुख्यमंत्र्यांच्या सभेत दोघांनी पेटवून घेतलेपंढरपूर, ता. ४ - कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर येथील दोन कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावरील जॅकेट पेटवून घेतले. "ही घटना खेदजनक असून, अशा प्रकारे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करणे योग्य नाही,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
येथील टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेचा प्रारंभ आज दुपारी झाला. या कार्यक्रमात चव्हाण बोलत असताना समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेले संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक महेश चव्हाण आणि कृष्णात पवार यांनी त्यांच्या अंगावरील जॅकेट अचानकपणे पेटविले. भाषण चालू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हा प्रकार लगेच आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना सावध केले, तसेच रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दोघांच्या पायांना जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या गोंधळानंतर अर्धवट राहिलेले भाषण चव्हाण यांनी नंतर पूर्ण केले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयोगही नेमण्यात आला आहे, तरीदेखील या मागणीसाठी पेटवून घेण्याचा जो प्रयत्न केला तो खेदजनक आहे. ही पद्धत चुकीची आहे.
'' या घटनेत जखमी झालेले चव्हाण म्हणाले, ""आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून अनेक वेळा निवेदने दिली आहेत; परंतु शासनाने दखल घेतली नसल्यामुळे आमच्यावर पेटवून घेण्याची वेळ आली आहे. आमच्या मागणीची त्वरित दखल घेतली गेली नाही तर यापुढे अधिक तीव्र निदर्शने केली जातील.''
Sunday, 4 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment