Thursday, 23 September 2010

खरा जेम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली

सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पण सतत बाबा पुरंदरे गैर हजार राहीले.
दि. ६ एप्रिल २०१० ते हजार झाले तेंव्हा लाड यांचे वकील अनंत दारवटकर यांनी बाबा पुरंदरेची उलट तपासणी केली असता पुरंदरे यांना उत्तरे देता आली नाहीत.

दारवटकर यांनी शहाजी राजे यांची जन्म तारीख विचारली असता पुरंदरे यांना तिथी सांगता आली नाही जे तिथी नुसार शिव-जयंती म्हणून सारखे ओरडत असतात त्यांना शहाजी राजे यांची तिथी नुसार जयंती सांगता आली नाही हे विशेष आणि हे शिव चरित्राचे थोर आभ्यासक.


शिवाय छत्रपति शिवाजी राजे- जिजाऊ मा साहेब स्वराज स्थापणेसाठी महाराष्ट्रात आल्या नंतर शहाजी राजे व शिवाजी राजे हे १६६०-६१ पर्यंत भेटले नाहीत असे जे पुरंदरे वारंवार सांगत सुटतात, राजा शिवछत्रपति या पुस्तकात पण त्यांनी असे लिहिले आहे ते उलट तपासणीत चुकीचे आहे ते उघड झाले.

९ सप्टेंबर-
या ऐतिहासिक दाव्याच्या दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी सुधाकर लाड यांचे वकील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी ब मो. पुरंदरे यांची जोरदार उलट तपासणी घेतली असता ब मो पुरंदरे निरुत्तर झाले.
मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती )हे अनंत दारवटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ब. मो. पुरंदरे यांना कोणत्या मराठ्याने स्वत:ची आई विकून मोठेपणा मिरवला आहे, असे एखादे उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी विचारला. या प्रश्नाने घायाळ, निरुत्तर झालेले ब. मो. पुरंदरे सारावा- सारव करीत तसे उदाहरण नाही पण मराठ्यांची तशी वृत्ती आहे , असे म्हणाले .
जेम्स लेन चे " शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक २००३ साली प्रसिद्ध झाल्यावर पुण्यातील काही मंडळीनी जेम्स लेनच्या निषेधार्थ पुण्यात सभा घेतल्या होत्या, तशी एखादी निषेधाची सभा तुम्ही घेतली होती का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी ब मो पुरंदरे यांना विचारला असता तशी सभा घेतली नाही असे ब मो पुरंदरे म्हणाले.

या दाव्याची पुढील सुनावणी ५ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

ह्या शिवाय ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन प्रकरणात कोणावर कोर्टात एकही दावा केलेला नाही. पण इथे सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पुरंदरे यांचे शिवाजी महाराजांवर किती खरे प्रेम आहे ते दिसूनच येत आहे.

Wednesday, 11 August 2010

दहशतवादाला धर्म नसतो

भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी प्रतिमेला आणि एकात्मतेला हिदुत्ववादी दहशतवादी गटाच्या कृत्यांमुळे धोका निर्माण झाला असून त्यांच्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या खात्याचा जुलै महिन्याचा अहवाल सादर करताना स्पष्ट केले की समझोता एक्सप्रेसवर झालेल्या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा संघटनेमार्फत करण्यात येईल व त्या हल्ल्यामागील कटाचा शोध घेण्यात येईल. त्याचबरोबर मालेगावमधील ८ सप्टेंबर २००६ चा दहशतवादी हल्ला, हैद्राबादच्या मक्का मशिदीवर १८ मे २००७ रोजी झालेला हल्ला आणि अजमेरच्या दर्ग्यावर ११ ऑक्टोबर २००७ रोजी झालेला हल्ला यांचाही शोध घेण्यात येईल. १८ फेब्रुवारी २००७ रोजी मध्यरात्री दिल्ली-लाहोर समझोता एक्स्प्रेसच्या दोन डब्यात बॉम्बस्फोट होऊन त्यात ६८ माणसे मृत्युमुखी पडली होती. मालेगाव येथील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने ११ जणांना अटक केली. त्यात एक साध्वी आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या एका माजी लष्करी कमांडरचा समावेश होता. ही पहिलीच घटना होती की जेव्हा भारतविरोधी दहशतवादी कृत्यात हिदुत्ववादी संघटनांशी संबंध असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या दोन घटनांमध्ये देखील हिदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. सी.बी.आय. आणि राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हे सत्य बाहेर आले. या सर्व स्फोटात सहभागी असलेल्या हिदुत्ववादी संघटनांचे धागेदोरे समझोता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोटांशी जुळतात का हे तपासून पाहण्यात येत आहे.

चौकशीत सत्य उघडकीस आल्यावर हादरून गेलेल्या रा.स्व. संघाने नेहमीप्रमाणे खुलासा केला की ''हे सर्व लोक आणि संघटना या रा.स्व. संघाच्या सदस्य नाहीत.'' त्यानंतर रा.स्व. संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना अलिकडेच सांगितले, ''स्फोट घडवून आणणाऱ्यांनी रा.स्व. संघाकडून प्रेरणा घेतली असल्याची शक्यता आहे. पण त्यापैकी कुणीही रा.स्व. संघाचा स्वयंसेवक नव्हता.'' यात काही नवीन नाही. महात्मा गांधींच्या हत्येनंतर नाथुराम गोडसेबद्दल असेच सांगण्यात आले होते. पण गोडसेच्या भावाने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की त्यांच्या कुटुंबातील सगळे भाऊ हे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते.काहींचे म्हणणे आहे की हिदू मूलतत्ववाद्यातील टोकाची भूमिका घेणारे काही घटक हिदुत्ववादी विषयांवर राजकीय तडजोड करण्याच्या कृत्यांना कंटाळून दहशतवादाचा आश्रय घेत असावेत. काही रा.स्व. संघाचे नेतेही मान्य करतात की काही वाट चुकलेले घटक हे दहशतवाद आणि हिसाचाराकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे सरसकट संघटनेवर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवता येणार नाही! गांधी हत्या प्रकरणी झालेल्या खटल्याच्या वेळी रा.स्व. संघाने जी भूमिका घेतली होती तिची पुनरावृत्ती याहीवेळी होताना दिसली.

पण रा.स्व. संघाचा इतिहास बघितला आणि त्याची कार्यपद्धती बघितली तर संघाचे निष्ठावान आणि काठावरचे असा भेद नेहमीच करण्यात येत असल्याचे दिसते. हिदूंना लष्करी शिक्षण देणे आणि हिसाचाराचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणे याबाबत रा.स्व. संघाचा दीर्घ इतिहास आहे. ''राजकारणाचे हिदूकरण करा आणि लष्करात हिदूपदपातशाही स्थापन करा'' असा मंत्र सावरकरांनी दिला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. बा.सि. मुंजे यांनी फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी यांची भेट घेण्यासाठी इटाली गाठली होती. रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे मुंजे यांना आदर्श मानीत होते. डॉ. मुंजे आणि मुसोलिनी यांची भेट १९ मार्च १९३१ रोजी झाली. डॉ. मुंजे यांच्या व्यक्तिगत दैनंदिनीतील २० मार्च १९३१ च्या नोंदीत इटालीयन फॅसिझममध्ये तरुणांना कसे लष्करी प्रशिक्षण देण्यात येते याविषयी प्रशंसात्मक मजकूर लिहिलेला आढळतो. इटालीहून भारतात परत आल्यावर डॉ. मुंजे यांनी नाशिक येथे सेन्ट्रल हिदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३५ साली केली. त्याचे रूपांतर पुढे १९३७ साली भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. (याच संघटनेवर हिदुत्ववादी दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचा आरोप करण्यात येत आहे.) ज्यूंचे नाझी फॅसिस्टांनी जे शिरकाण केले त्याबद्दल १९३९ साली गोळवलकरांनी आनंद व्यक्त केला होता आणि म्हटले होते, ''या घटनेपासून हिदूंनी चांगला बोध घेण्याची आवश्यकता आहे.''

अलिकडेच बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर रा.स्व. संघाचे दोन हात समजल्या जाणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिदू परिषद यांनी कारसेवकांना योग्य प्रशिक्षण दिल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले होते, ''बाबरी मशिदीचा विध्वंस करण्याचे काम कारसेवकांनी अत्यंत तडफेने पार पाडले याबद्दल मला अभिमान वाटतो. हे काम एखाद्या ठेकेदारालाही इतक्या चांगल्या तऱ्हेने करता आले नसते!'' रा.स्व. संघाशी अशी वैचारिक बांधिलकी असलेल्यांचा संताप अलिकडेच उफाळून आला आणि निरनिराळ्या ठिकाणी घडलेल्या दहशतवादी कृत्यात हिदू संघटनांचा सहभाग असल्याच्या चित्रफितींचे चॅनेलवरून प्रसारण केल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर हल्ला चढवून तोडफोड केली. ज्या ध्वनिफिती ऐकविण्यात आल्या त्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना ठार मारण्याचा कट करण्यासंबंधीचे संभाषणही होते. फॅसिस्टांची आठवण करून देणाऱ्या अशा असहिष्णू कार्यकर्त्यांकडून होणारे दहशतवादी हल्ले या लोकांची वैचारिक बांधिलकी स्पष्ट करतात आणि त्यांच्या कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांचे स्वरूप स्पष्ट करतात.

'हिदू दहशतवाद' या शब्दाला आक्षेप घेताना रा.स्व. संघाचे सरसंघचालक म्हणतात, ''तुम्ही सगळ्या हिदू समाजाला दहशतवादाशी का जोडता? अशातऱ्हेचा शब्द निर्माण करणे हा रा.स्व. संघाची बदनामी करण्याचा कट आहे. हिदुत्ववादी शक्तींचा पराभव करण्याचा हा राजकीय कट आहे.'' पण आम्ही जो म्हणतो तो हिदुत्ववादी दहशतवाद आहे. हिदू दहशतवाद नव्हे! कोणत्याही धार्मिक समुदायाला दहशतवादी कृत्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही. पण हाच युक्तिवाद अन्य धर्मासाठीही वापरला पाहिजे. पण रा.स्व. संघाला ते मान्य नाही. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात झालेल्या अटकेपूर्वी ऑक्टोबर २००८ मध्ये रा.स्व. संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात रा.स्व. संघाने केलेल्या ठरावात, ''इस्लामी दहशतवाद पोलादी हातांनी नियंत्रणात ठेवण्यात यावा'' असे म्हटले होते. हा केवळ दुटप्पीपणाच नाही तर आधुनिक धर्मनिरपेक्षतावादी भारतीय लोकशाहीचे रूपांतर रा.स्व. संघाच्या संकल्पनेनुसार 'हिदू राष्ट्रात' करण्याच्या संकल्पाचे मूळ कोणत्या वैचारिक स्थितीत गुंतले आहे ते स्पष्ट करणारे आहे. दहशतवादाला धर्म नसतो हे मी सातत्याने माझ्या स्तंभातून मांडत आलो आहे. ते केवळ राष्ट्रविरोधी कृत्य असते. त्याविषयी देशाने सहिष्णुता बाळगण्याचे कारण नाही, निरनिराळ्या पद्धतीचा दहशतवाद हा एकमेकांचे पोषण करीत असतो आणि देशाची एकात्मता नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही आधाराचे रक्षण करण्यासाठी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनाशक वैचारिक पद्धतींना पराभूत करण्याची गरज आहे.

Wednesday, 14 July 2010

स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे - डॉ. पवार

नांदेड - जेम्स लेनच्या तोंडून जे वदवायचे होते ते येथील काही गद्दारांनी वदवून घेतले. त्यामुळे जेम्स लेनच्या आधी अशा गद्दारांचा निषेध केला पाहिजे. राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊंचा व छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा जेम्स लेन हा राष्ट्रीय गुन्हेगार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मंगळवारी (ता. 13) केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित इतिहास संशोधक परिषदेत ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती भीमराव नरवाडे पाटील व जी. व्ही. थेटे होते.

श्री. पवार म्हणाले, की इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक वाचण्याची गरज आहे. जेम्स लेनने गावगप्पांच्या आधारे केलेले लेखन हे कधीही इतिहासाच्या पात्रतेचे होऊ शकत नाही. जेम्स लेन नावाचा खरा साप गरळ ओकून देशातून निघून गेला. याला मदत करणाऱ्या स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्‍यक आहे. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कडक कायदा करण्याची घोषणा केल्याबद्दल श्री. पवार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले.

मराठवाडा मेडिकल फाउंडेशन ट्रस्टतर्फे आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण व्याख्यानमालेत "शिवछत्रपती ः स्वराज्याची संकल्पना' या विषयावर बोलताना डॉ. पवार पुढे म्हणाले, की शाहू महाराज, छत्रपतींची अनेक धोरणे डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या काळात राबवून हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण केले; तसेच शाहू महाराजांचे लोकाभिमुख धोरण महाराष्ट्र शासन राबवीत आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हा-आम्हाला सांस्कृतिक चेहरा दिला. मराठ्यांना स्वत:ची ओळख देणारा हा पहिलाच क्रांतिकारक असून, लोकशाहीचा पाया हा धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन डॉ. पवार यांनी केले.

छत्रपतीचे लोकाभिमुख ग्रंथ मराठी भाषेतच नाही, तर राज्यात बाहेरील 16 भाषांमध्ये प्रकाशित होणार आहेत. शाहू महाराजांचे ग्रंथ एकूण पाच भाषांत प्रकाशित करण्यासाठीच्या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकरकमी 26 लाख रुपये दिले त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवानी टापरे या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. डॉ. तेजस्विनी वाडेकर यांनी प्रास्ताविक केले.

कुलगुरू डॉ. निमसे म्हणाले, की शिवछत्रपतींचा दूरदर्शीपणा त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी दाखविला असता व तंत्रज्ञानाचा अवलंब केला असता तर भारताची औद्योगिक क्रांतीची संधी हुकली नसती. डॉ. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Thursday, 24 June 2010

जाणता राजा शाहू महाराज


आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.

बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.

‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.

करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला. अशा थोर जाणता राजास मानाचा मुजरा.

Sunday, 6 June 2010

तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला शिक्षा

विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला तीन महिने कैद

पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या गोपाळ बडवे (वय ५५, रा. बडवे गल्ली, पंढरपूर) याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी. सुभेदार यांनी तीन महिन्यांची साधी कैद, १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात १५ मे २००३ रोजी घडलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली होती. गोपाळ बडवे हा १५ मे २००३ रोजी मंदिरात झोपण्यासाठी आला होता. रात्री मंदिर बंद झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे काही कर्मचारी स्वच्छतेची कामे करीत होते. रात्री १.२० वा. गोपाळ बडवे हा मंदिरातील गोमुख या तीर्थकुंडाजवळ लघुशंका करीत होता. मंदिर समितीचे कर्मचारी माणिक यादव यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून गोपाळ बडवेला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध सामाजिक संघटनांनी निषेध करून गोपाळ बडवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.


यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांनी याप्रकरणाबाबत तत्कालीन प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून रमेश चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गोपाळ बडवे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


यानंतर पंढरपूर न्यायालयात खटला भरण्यात आला. न्यायालयात पाच जणांच्या साक्षी नोंदविल्या. तपासी अंमलदार आर.जे. कुलकर्णी यांच्या तपासातील बाबीही तपासण्यात आल्या. बचावासाठी सुधीर बडवे याने साक्ष दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तात्रय नलावडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने गोपाळ बडवे याला तीन महिने कैद तर १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Tuesday, 15 December 2009

डॉ. जयसिंगराव पवार यांचे श्यामसुंदर मुळे यांना प्रत्युत्तर:

लोकप्रभात प्रसिध्द झालेल्या ‘चौथीची इतिहास बखर’ या श्यामसुंदर मुळे यांच्या लेखाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिलेले प्रत्युत्तर...

गेल्या जूनमध्ये बालभारतीने इयत्ता चौथी इतिहासाचे ‘शिवछत्रपती’ हे पाठय़पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातील ‘शिवरायांचे शिक्षण’ या पाठात त्यांचे शिक्षण शहाजीराजे व जिजाबाई यांच्या देखरेखीखाली झाले आणि ते शहाजीराजांनी नेमलेल्या विख्यात शिक्षकांनी केले, अशी समकालीन पुराव्याच्या आधारावर इतिहासाची पुनर्माडणी केली होती. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजी कोंडदेवांनीच केले, असे मानणाऱ्या प्रस्थापित इतिहासाच्या कैवाऱ्यांनी या पुनर्माडणीविरुद्ध मोठे रान उठविले. त्यामध्ये पुस्तकात घातलेला नवा मजकूर बिनपुराव्याचा आहे, या आरोपापासून पुस्तकात दादोजींचे नावच वगळले आहे, त्यांना शिवरायांच्या गुरुपदावरून हटवले आहे. इथपर्यंत दादोजी समर्थकांनी मजल मारली. त्यापैकी अनेक जणांनी हे पुस्तकही पाहिले नव्हते.

वास्तविक जुन्या पुस्तकात कुठेही दादोजींचा उल्लेख शिवरायाचे ‘शिक्षक’ अथवा ‘गुरू’ म्हणून नव्हता. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्नच नव्हता. पूर्वीच्या पुस्तकातील दादोजींचा शहाजीराजांना इमानी, न्यायी, एकनिष्ठ, कडक शिस्तीचा व चोख कारभार करणारा सेवक म्हणून असलेला उल्लेख जसाच्या तसा ठेवला होता. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजींच्या देखरेखीखाली झाले हा उल्लेख वगळून ते शहाजीराजे व जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, असा बदल केल्यामुळे दादोजी समर्थकांनी एकच हलकल्लोळ माजविला.तेव्हा दादोजी समर्थकांच्या सर्व आक्षेपांचे पुराण्यानिशी खंडन करणारे तीन लेख मी २१ जून ०९ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध केले. त्यानंतर या लेखांच्या विरोधात, माझ्या मुद्दय़ांचे खंडन करणारी कोणाचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. परवाच्या ‘लोकप्रभा’त मात्र (दि. २७ नोव्हें.) श्यामसुंदर मुळे यांनी एक प्रदीर्घ लेख लिहून आपली प्रतिक्रिया बऱ्याच उशिरा का होईना दिली आहे. प्रस्तुतचा लेख त्यांच्या प्रतिक्रियेविषयी आहे.

मुळेंच्या लेखाचे उद्देश

मुळेंच्या लेखाचे दोन मुख्य उद्देश दिसतात. पहिला म्हणजे जयसिंगराव पवार यास ‘टारगेट’ करून त्यांनी चौथीच्या पुस्तकाची ‘बखर’ कशी केली आहे, हे सांगणे आणि दुसरा म्हणजे ज्या ‘शिवभारत’ या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इतिहासाची पुनर्माडणी केली आहे, तो ग्रंथच कसा अधिकृत अतएव विश्वसनीय नाही, हे वाचकाच्या मनावर बिंबवणे.खरे तर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक होते, अगर गुरू होते, हे सिद्ध करणे हे मुळेंचे तिसरे उद्दिष्ट असायला हवे होते, पण त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची काहीही मांडणी केलेली नाही. शिवभारतासारख्या शिवकालातील ग्रंथाच्या कर्त्यांने म्हणजे कवींद्र परमानंदाने ‘दादोजी कोंडदेवाला अनुल्लेखाने मारल्या’ने आणि जयसिंगराव पवारांनी त्याच ग्रंथाच्या आधारावरून दादोजींना शिवरायांच्या शिक्षक पदावरून (की गुरुपदावरून?) हटविल्यामुळे ते ‘सखेदाश्चर्य’ व्यथित झाले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेचे खरे कारण हे होय.

ही कोण नीती?

प्रथमत: एक लक्षात घेतले पाहिजे की या पुस्तकासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्याचे संपूर्ण पुनर्लेखन केलेले नाही. बालभारतीकडे गेली अनेक वर्षे या पुस्तकाविषयी ज्या तक्रारी व सूचना आल्या होत्या, त्यांचा विचार करून आवश्यक तो बदल करणे एवढेच समितीस अभिप्रेत होते. तसे पुनर्लेखन समितीने केले आहे. तथापि समितीने सर्वच पुस्तक लिहून काढले आहे, असे गृहीत धरून मुळे यांनी टीका केली आहे. उदा. शिवरायांचे सईबाईशी लग्न, बाजीप्रभूंचा पराक्रम इत्यादी.दादोजींच्या संदर्भात त्यांची प्रतिमा डागाळेल, असा कोणताही मजकूर आम्ही नव्याने घातलेला नाही. उलट त्यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी देणारा जुन्या पुस्तकातील मजकूर आम्ही गाळला आहे. जुन्या पुस्तकात शिवरायांचा स्वराज्याचा उद्योग पाहून दादोजी म्हणतात, ‘‘राजे, सुलतानाचे बळ प्रचंड! त्यांच्याविरुद्ध तुम्ही उठाव करणार? तुम्ही लहान. तुमची शक्ती लहान. म्हणून भीती वाटते इतकेच!’’ दादोजींचा मुळातच शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीला विरोध होता, असे मत जे लोक मांडतात, त्यांना हा मजकूर पुष्टी देणारा ठरतो; त्यामुळे दादोजींची प्रतिमा नकळत मलिन होते, म्हणून तो मजकूर आम्ही नव्या पुस्तकात गाळला. याबद्दल एका शब्दानेही दादोजीसमर्थक समितीचे आभार मानत नाहीत; उलट दादोजींच्या कामगिरीचे महत्त्व सांगणारा परिच्छेद आम्ही ठेवला आहे, तो आमच्यावर ‘जातीयतेचा आरोप’ येऊ नये म्हणून ठेवला आहे, असा आरोप करतात, ही गोष्ट कोणत्या नीतीत बसते? ते कसे काय सिद्ध होते?

पण या किरकोळ गोष्टी आहेत. मुळे यांचा माझ्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे तो मी दादोजींबद्दल माझे पूर्वीचे मत बदलेले म्हणून. माझे पूर्वीचे मत वाचकांना कळावे, यासाठी त्यांनी मी ३०-३२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पुस्तकातील अनेक उतारे उद्धृत केले आहेत आणि गमतीची बाब अशी की, शेवटी त्यांनी एखादे ऐतिहासिक सत्य सापडल्याच्या आविर्भावात विचारले आहे, ‘‘वरील उताऱ्यांवरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे शिक्षक होते हे सिद्ध होत नाही काय?’’ते कसे काय सिद्ध होते? या उताऱ्यांवरून माझे पूर्वीचे मत आता बदलले आहे, हे स्पष्ट होईल. पण माझे हे मत तुमचा ऐतिहासिक पुरावा कसा होतो? एखाद्या लेखकाचे मत म्हणजे पुरावा नव्हे! ज्यांच्या आधारावर इतिहास रचला जातो, ती साधने म्हणजे पुरावा हा इतिहासशास्त्राचा साधा नियम आहे. आणि समजा माझे एके काळचे मत हाच तुमचा पुरावा ठरत असेल, तर आताचे माझे बदलेले मत तुमचा पुरावा का होत नाही? खरे तर कोणत्याही लेखकाचे सर्वात अलीकडचे मत ग्राह्य़ धरावयास हवे. पण मुळे तसे मानत नाहीत. कारण ते त्यांच्या विरोधात जाते.माझ्या पूर्वीच्या मताच्या संदर्भात मुळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वीही अनेक लोक दादोजी हे शिवरायांचे ‘गुरू’ नव्हते असे म्हणत असता त्यांच्या मताची दखल मी का घेतली नाही? पूर्वीचे मत बदलण्यास मला ३०-३२ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी का लागला? (माझ्या जून ०९ मधील लेखांना उत्तरे द्यावयास मुळेंनी ५ महिने का घेतले, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो!) आता वादाकरिता आपण गृहीत धरू की मुळेंच्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना हवी तशी दिली आणि त्या सर्वाचा दोष मी स्वीकारला, तरी मूळ मुद्दा ‘दादोजी शिवरायांचे शिक्षक होते’, हा कसा काय सिद्ध होतो? मी माझे मत केव्हा बदलले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पुराव्यावरून बदलले हे महत्त्वाचे आहे.

मुळे यांचे अपूर्व धाडस

या संदर्भात मुळे यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की त्यांनी माझ्यावर शरसंधान करण्यासाठी माझ्या जुन्या पुस्तकाचे आयुध वापरले आहे, ते गेल्या दीड-दोन वर्षांत अनेकांनी वापरून बोथट झालेले आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार आणि चौथी इतिहास यांच्या संदर्भात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांनी आपल्या मुलाखतीत व लेखांत माझ्या जुन्या पुस्तकातील उतारे उद्धृत केले होते आणि ‘पवारांना आताच कसा काय साक्षात्कार झाला?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. पण यापैकी कुणीही माझे नवे मत ज्या शिवभारत ग्रंथावर आधारित आहे, त्या ग्रंथास ‘अनधिकृत’ अथवा ‘अविश्वसनीय’ म्हटलेले नाही. पण तसे म्हणण्याचे अपूर्व धाडस मुळे यांनी दाखवले आहे!मुळे यांनी याहून मोठे धाडस दाखविले आहे ते, शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी राजमाता जिजाऊ दरबारात कशावरून हजर होत्या, हा प्रश्न विचारून! हाही प्रश्न आतापर्यंत कुणी विचारला नव्हता. पुढे ते आणखी प्रश्न करतात की शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, याला तरी पुरावा काय? महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातील ज्या महान मातेने आपल्या युगकर्त्यां पुत्राची जडणघडण केली, हिंदवी स्वराज्याचे व सार्वभौम मऱ्हाटा राजपदाचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न साकार होत असता राज्याभिषेक प्रसंगी ती माता दरबारात हजर असणार नाही तर कुठे असणार? रायगडावरील एखाद्या महालात दारे बंद करून त्या बसतील काय? त्यांचे दरबारात उपस्थित असणे ज्ञात इतिहासाशी सुसंगत नव्हे काय?

जिजाऊ शिवरायांची सावली

कर्नाटकातील जहागिरीतून पुणे जहागिरीत आल्यावर शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली चालूच राहिले, या पाठय़पुस्तकातील विधानामुळे मुळे फारच व्यथित झाले आहेत. शिवभारतात तसा उल्लेख नसता असे विधान केलेच कसे, किंवा त्याचे संदर्भ जयसिंगरावांनी कुठून मिळवले असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.शिवाजी महाराजांसारखा महापुरुष जिजाबाईंनी घडविला, या त्यांच्या कामगिरीत त्यांच्या शिक्षणावरील देखरेख ही फारच मामुली गोष्ट आहे. शिवरायांच्या जीवनात त्या त्यांच्या संरक्षक देवता म्हणून राहिल्या आहेत, असे तमाम शिवचरित्रकार म्हणत आले आहेत. पण श्यामसुंदर मुळे यांना त्याचा पुरावा हवा आहे. ऐतिहासिक संदर्भ हवे आहेत. तेव्हा शिवरायांच्या शिक्षणावर देखरेखच नव्हे, तर त्यांची सावलीप्रमाणे सोबत जिजामातेने केल्याचा दाखलाच आम्ही येथे सादर करत आहोत.शहाजीराजांच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे या पंडिताने ‘राधामाधवविलासचंपू’ नावाचे एक शहाजीचरित्र रचले आहे.

त्यामध्ये शहाजीराजासारख्या पराक्रमी पुरुषास जिजाईसारखे स्त्रीरत्न कसे शोभून दिसत होते आणि जिजाईची कीर्ती सर्व भरतखंडात कशी पसरली होती, याचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘‘जशी चंपकेशी खुले फुलल जाई। भली शोभली ज्यास जाया जिजाई ।। जिचे कीर्तिचा चंबु जंबुद्विपाला। करी साऊली माऊलींसी मुलाला।।’’जयराम पिंडेच्या या कवनावर भाष्य करताना इतिहासाचार्य राजवाडय़ांनी म्हटले आहे, ‘‘जिजाई ही शहाजीसारख्या धीर, उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि.. स्वत:च्या धीर, उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काळी सर्व भरत खंडभर पसरली होती. इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या.. सावलीखाली सर्व जंबुद्विपातील सज्जन लोक यवनाच्या जुलूमाला कंटाळून आश्रयार्थ येत असत, असे जयराम लिहितो. (यावरून) जिजाई ही कोणत्या तोलाची बाई होती, याचा अंधुक तर्क जयरामाच्या या समकालीन उक्तीवरून करता येतो. पुणे व सुपे प्रांताची व्यवस्था पाहणाऱ्या, शिवाजीच्या शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या, स्वत: गोरगरिबांचा समाचार घेणाऱ्या व गुणी सज्जनांना आश्रय देणाऱ्या या बाईच्या कर्तबगारीचे तपशीलवार वर्णन न देता केवळ एक त्रोटक श्लोक करून कवी गप्प बसला, हे पाहून कवीवर संशोधकांचा राग झाल्यास तो अयथार्थ होणार नाही.’’इतिहासाचार्याच्या भाष्यानंतर माझ्यासारख्याने काही म्हणण्याची गरज नाही, इतके ते मार्मिक आहे. याउपरीही श्यामसुंदरांना जिजाऊंच्या शिवरायांच्या शिक्षणावरील पुरावा हवा असेल तर आम्हीच त्यांना विचारतो की, शिवरायांच्या शिक्षणावर अन्य कोणाची देखरेख होती असे सांगणारा एखादा समकालीन पुरावा त्यांनी सादर करावा.

मुळे यांचा खरा राग

मुळे यांचा खरा राग आहे तो आम्ही शिवरायांचे शिक्षण दादोजींनी केले, याला समकालीन पुरावा मागितल्याबद्दल आणि समकालीन कागदपत्रांत तो उपलब्ध नसल्याने दादोजींना शिक्षक पदावरून हटविल्याबद्दल. खरे म्हणजे दादोजींनी शिक्षण केले यास समकालीन पुरावा नाही, हे एकच कारण त्यासाठी नाही; तर शिवरायांचे शिक्षण कोणी केले, कोणकोणत्या विद्या व कला त्यांनी शिकवल्या याविषयी स्पष्ट निर्देश परमानंदाने शिवभारतात केला आहे. त्यामुळे शिवरायांच्या शिक्षणाचे, विद्यादानाचे श्रेय त्या शिक्षकांना दिले पाहिजे, अन्य कुणास नाही, असा विचार तज्ज्ञ समितीने केला. त्यामागे कोणताही आकस नाही.शहाजीराजांनी बंगळूरहून पाठवून दिलेल्या ‘विख्यात अध्यापक’ वर्गाने शिवरायाचे शिक्षण केले, असे परमानंद सांगतो तर त्यांची नावे का देत नाही, असे मुळे विचारतात. २१व्या शतकात असा प्रश्न कुणी उपस्थित करेल, अशी पूर्वकल्पना परमानंदास असती तर त्याने ती दिली असती! दुसरे असे की शिवरायांना शिकवलेल्या विविध कला व शास्त्रे यांची यादी एवढी मोठी आहे की ती शिकवणाऱ्या अध्यापकांच्या नावाची लांबलचक यादी देणे त्याने टाळले असावे. पण नावे दिली नाहीत म्हणून परमानंदाची साक्षच खोटी असे होत नाही.

पुरंदरे-मेहेंदळे काय म्हणतात?

कविंद्र परमानंदाचे ‘शिवभारत’ हे कसे अव्वल दर्जाचे विश्वसनीय साधन आहे, हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तसा अवकाश येथे नाही. म्हणून मी महाराष्ट्रातील फक्त दोन विख्यात शिवचरित्रकारांची शिवभारतासंबंधीची मते उद्धृत करत आहे.पहिले आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ते म्हणतात, ‘‘माझा अंदाज आहे की शिवाजी महाराजांच्या बालपणापासून परमानंदाचा व भोसले घराण्याचा संबंध असावा. (बहुधा १६३५ च्या पुढे) तो आपल्या संपूर्ण लेखनात जे बारकावे देतो ते इतके विश्वसनीय आहेत की तितक्या बारकाव्यानिशी लिहिणारा हा मनुष्य जास्त जवळचा संबंध असल्याखेरीज इतके अचूक लिहू शकणार नाही. आपण शिवभारताचा तौलनिक अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, अस्सल पर्शियन कागदपत्रांतून किंवा मराठी कागदपत्रांतून, जेधे शकवलीसारख्या कागदपत्रांतून जी माहिती आपणाला मिळते तशीच माहिती हा परमानंद कवी शिवभारतात लिहितो. त्यामुळे तो एक साधनग्रंथ बनला आहे.. एकंदरीत परमानंदाचा आणि शिवाजीमहाराजांचा मोठा सहवास होता, असे दिसते. त्यामुळे परमानंदांनी लिहिलेले, ‘शिवभारत’ अतिशय विश्वसनीय माहितीपूर्ण आहे.’’दुसरे शिवचरित्रकार मेहेंदळे यांनी म्हटले आहे : ‘‘शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे.. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास येत असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही.’’

मुळे यांचा अजब न्याय

आता ‘शिवभारत’विषयी मुळे काय म्हणतात पाहा- ‘‘जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ हे शिवाजीचे अधिकृत चरित्र नव्हे. कारण त्यामध्ये इ. स. १६३० ते १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आला आहे. शिवाजीचा ३१ वर्षांपर्यंतचाच इतिहास ‘शिवभारत’ मध्ये असल्याने शिवाजीचे उर्वरित १९ वर्षांचे आयुष्य समजून घेण्यासाठी अन्य ऐतिहासिक साधनांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ला अधिकृत चरित्र कसे मानता येईल?’’शिवभारतासारख्या समकालीन अव्वल साधनास ‘अनधिकृत’ ठरविण्यासाठी मुळे यांनी केलेला खटाटोप थक्क करणारा आहे! त्यांचे मत मान्य केले तर पुरंदरे-मेहेंदळे या शिवचरित्रकारांना इतिहासशास्त्रातील काही समजत नाही, असे मानावे लागेल! हे खरे की इतिहास संशोधक दिवेकर यांना शिवभारताचे हस्तलिखित त्रुटित स्वरूपात मिळाले. एकूण ३२ अध्यायात शेवटच्या अध्यायाचे तर नऊच श्लोक उपलब्ध झालेत. पुढचे श्लोक व अध्याय भविष्यात सापडणारच नाहीत असे नाही. तसे ते सापडले तरच मुळे शिवभारताला अधिकृत मानणार, नाहीतर ते अनधिकृत समजणार! मुळेंच्या इतिहासशास्त्रातील हा मोठा अजब न्याय आहे.‘शिवभारत’ हे अधिकृत शिवचरित्र एवढय़ासाठी मानले जाते की त्यातील अनके घटना, तारखा व व्यक्ती याविषयीची विश्वासार्हता प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुद्द परमानंद हा शिवाजी महाराजांच्या सहवासातील असून त्यांच्या आदेशानेच त्याने हे चरित्र रचले आहे! याशिवाय शिवभारताच्या अधिकृतपणाला आणखी काय पुरावे हवेत? पण झोपी गेलेल्यास जागे करता येते, सोंग घेणाऱ्यास नाही?अशा प्रकारच्या समकालीन विश्वसनीय पुराव्याच्या आधारे पुनर्लेखन केलेल्या चौथी इतिहासाच्या पाठय़पुस्तकास ‘जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली बखर’ म्हणून हिणवावे, हे दुर्दैव आहे. ज्या बखरींच्या आधारावर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक म्हणून ते पुढे आणू इच्छितात, त्याच बखर वाङ्मयास त्यांनी कमी लेखावे, हे बरे नव्हे.

मुळे यांना आवाहन

मुळे यांनी आपल्या प्रदीर्घ लेखात, जयसिंगराव पवारांनी आपली मते कशी बदलली, त्यांनी आपले नवे मत ज्या शिवभारताच्या आधारे मांडले आहे, ते कसे अधिकृत नाही, जिजाईंनी शिवरायांच्या शिक्षणावर देखरेख कशावरून केली, त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी दरबारात कशावरून हजर होत्या, असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर साद्यंत चर्चा केली आहे. तथापि त्यांनी अशी चर्चा करण्यापेक्षा दादोजी कोंडदेवांनी शिवरायास अमुक एक विद्या वा कला शिकवल्याचा दोन ओळींचा अस्सल समकालीन पुरावा सादर केला असता तर माझ्यावरच नव्हे तर सर्व महाराष्ट्रावर उपकार झाले असते. म्हणजे दादोजी शिवरायांचे शिक्षक होते की नव्हते, हा वाद कायमचा निकालात निघाला असता. माझे श्यामसुंदर मुळे यांना आवाहन आहे की, त्यांनी अशा पुराव्याचा अवश्य शोध घ्यावा आणि तो पुरावा महाराष्ट्राच्या समोर मांडावा. तसे झाले तर आम्ही आमच्या मतात जरूर सुधारणा करू आणि चौथीच्या पुस्तकातही ती अमलात आणू. त्यासाठी दुराग्रही असण्याचे कारण नाही.कारण इतिहास हे एक प्रवाही शास्त्र आहे. जसजशी नवनवीन साधने शोधली जातात, जसजशी नवनवीन दृष्टिकोनातून त्यांची चिकित्सा व मांडणी होते, तसतसा तो बदलत जातो. तो तसा बदलत जाणे हे त्याच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे लक्षण आहे. एके काळी बखरी प्रमाणभूत मानून इतिहासकारांनी शिवाजी- रामदास भेट इ. स. १६४९ मध्ये निश्चित केली होती. पुढे गोविंदराव चांदोरकर, प्रा. न. र. फाटक प्रभृतींनी त्यांची भेट इ. स. १६७२ पर्यंत झालीच नव्हती, हे कागदपत्राच्या आधारे सिद्ध केले. आज त्यांचे मत सर्वमान्य झाले आहे. ५०-६० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीराजे म्हणजे मद्यपी, व्यभिचारी व राज्यबुडवा राजा म्हणून मराठी इतिहास व साहित्य यामध्ये प्रतिमा होती. बेंद्रे, गोखले, पगडी प्रभृतींनी आपल्या संशोधनाने इतिहासाची पुनर्माडणी करून संभाजी राजांची एक तेजस्वी व पराक्रमी प्रतिमा महाराष्ट्रासमोर आणली. आज ती प्रतिमा मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय बनला आहे. इतिहासाची पुनर्माडणी करण्याचा प्रत्येक पिढीला अधिकार असतो. नव्हे तो असायलाच हवा. पण अशी मांडणी भरभक्कम पुराव्याच्या आधारे करायला हवी, हेही तेवढेच खरे.मुळे यांनी भावनेच्या भरात मी केलेल्या इतिहासाच्या पुनर्माडणीबद्दल ‘‘इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही.’’ अशी शापवाणी उच्चारली आहे. पण इतिहासाची अशी साक्ष आहे की फाटक, बेंद्रे, गोखले, पगडी या इतिहासकारांना इतिहासाने केवळ क्षमाच केली नाही तर त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविले आहे. मी या मोठय़ा इतिहासकारांच्या पंगतीत बसत नाही, याची मला जाणीव आहे. पण इतिहास मला क्षमा करेल की शिक्षा करेल, हे काळच ठरवील, श्यामसुंदर मुळे नव्हे!

Sunday, 21 June 2009

शिवरायांचे शिक्षण कोणी केले?


खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच "बालभारती'तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा "शिवरायांचे गुरू' म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे "शिक्षक' म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.'' (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील "समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय' साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.'' (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये "शिवाजीची साक्षरता' या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून "आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,' असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.
डॉ. जयसिंगराव पवार

Sunday, 14 June 2009

अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर


जुलै १९२० मध्ये "बहिष्कृत हितकारणी' सभेची स्थापना केल्यापासून १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माचा स्वीकार करण्यापर्यंतचा ३६ वर्षांचा काळ हा जातिव्यवस्था आणि अस्पृश्‍यतेच्या समूळ उच्चाटनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाकीपणे केलेल्या संघर्षाचा काळ आहे. केवळ भारताच्याच नव्हे, तर आधुनिक जगाच्या इतिहासातील हा संघर्ष एका अर्थाने अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. भारतातील जाती-वर्ण-अस्पृश्‍यतेवर आधारित विषम समाजव्यवस्थेमुळे येथे सामाजिक समता प्रस्थापित करण्याला डॉ. आंबेडकरांना अग्रक्रम द्यावा लागला. राजकीय लोकशाहीवर त्यांची प्रचंड निष्ठा असली, तरी आर्थिक समता निर्माण केल्याशिवाय सामाजिक समता अर्थपूर्ण ठरू शकत नाही आणि तांत्रिक राजकीय लोकशाही तर निरर्थक ठरते, याबद्दल त्यांना प्रथमपासूनच खात्री होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रहित आणि गरिबांच्या आर्थिक समस्यांशी निगडित असलेल्या सगळ्या आर्थिक समस्यांचा मूलगामी आणि विश्‍लेषणात्मकदृष्ट्या सकस व समृद्ध अभ्यास केला.
कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात "पीएच.डी.' आणि लंडन विद्यापीठातून (सध्याच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स) "डी.एस्सी' मिळविणारे डॉ. आंबेडकर हे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय आहेत. ब्रिटिश कालखंडातील प्रादेशिक वित्तीय व्यवस्थेचा विकास (दि इव्हॉल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा त्यांच्या "पीएच.डी.चा विषय. त्यांचे मार्गदर्शक आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ प्रा. सेलिगमन यांनी या प्रबंधास प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाची थोरवी व्यक्त करताना ते म्हणतात, ""डॉ. आंबेडकरांचा प्रबंध वस्तुनिष्ठ असून आणि त्यांच्या स्वतःच्या देशात घडून येत असलेल्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरांचे (घटनांचे) निःपक्षपाती विश्‍लेषण त्यात आहे. त्यांच्या अभ्यासातून निघणारे निष्कर्ष हे इतर देशांनाही लागू होणारे आहेत.''
"डी.एस्सी'साठी डॉ. आंबेडकरांनी "भारतीय रुपयाची समस्या -स्वरूप आणि उपाय' हा विषय निवडला होता. त्यांचे मार्गदर्शक प्रा. एडविन कॅनन यांनी त्यांच्या अभ्यासाची मुक्तकंठाने स्तुती केली होती. १९१८ मध्ये आंबेडकरांनी भारतातील शेती क्षेत्रासमोरील समस्यांचे मूलगामी विश्‍लेषण केले. १९३६ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यात गरिबांच्या हिताचे कोणते कार्यक्रम असावेत, याचे दिग्दर्शन केले. १९४२ ते १९४६ या काळात कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हिताचे अनेक कायदे करण्यात आणि कार्यक्रम राबविण्यात आणि पुढाकार घेतला. पुढे १९४६ मध्ये "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्‌स फेडरेशन'च्या वतीने घटना समितीस त्यांनी जो मसुदा सादर केला, तो "स्टेट्‌स अँड मायनॉरिटीज' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने शासन व्यवस्थेचे अर्थव्यवस्थेत नेमके कोणते स्थान असावे, याचे मार्गदर्शन केलेले आहे.
शासकीय समाजवाद
डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरण आणि कार्यक्रम हे राज्य घटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजेत. शेतीचे, मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्‍यकतेचा अंतर्भाव असायला हवा. हे कार्यक्रम शाश्‍वत होण्यासाठी त्यांना राज्य घटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा. म्हणजे अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला, तरी त्याला हे कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत.
या योजनेला डॉ. आंबेडकरांनी "घटनात्मक शासकीय समाजवाद' (कॉन्स्टिट्युशनल स्टेट सोशॅलिझम) असे नाव दिले.
गेल्या ७०-८० वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत जे महत्त्वाचे बदल झाले, त्यांचा विचार करता डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या घटनात्मक शासकीय समाजवादाच्या आराखड्याची फेरमांडणी करणे आवश्‍यक आहे. सध्याच्या जागतिक आर्थिक अरिष्टाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शासन आणि बाजारपेठ यांचे अर्थव्यवस्थेत स्थान काय असावे, त्यांची कार्यक्षेत्रे नेमकी कोणती असावीत, त्यांचे परस्परसंबंध कसे असावेत, ते एकमेकांना पर्याय आहेत की पूरक, आर्थिक विकास सर्वसमावेशक करून व त्याचे फायदे गरिबापर्यंत पोचवून कल्याणकारी अर्थव्यवस्था कशी आणता येईल, भाववाढ रोखण्याबरोबरच आर्थिक अरिष्टांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी बेरोजगारी कमी करून रोजगार कसा वाढवता येईल, आदी प्रश्‍नांची जगभर चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने विचार करता डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांतून कोणता निष्कर्ष काढता येणे शक्‍य आहे आणि त्याचे आजच्या जागतिक आर्थिक अरिष्टांच्या संदर्भात काय महत्त्व आहे, हे पाहायला हवे.
सध्याच्या आर्थिक अरिष्टाची सुरवात अमेरिकेतील वित्तीय संस्था आणि शेअर बाजार कोसळण्यापासून झाली. गेल्या २५-३० वर्षांच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्व राष्ट्रीय अर्थव्यवस्था एकमेकींशी पूर्वीपेक्षा खूपच निगडित झाल्यामुळे या अरिष्टाला जागतिक स्वरूप प्राप्त होणे अपरिहार्य होते. निर्यातीवर भर देणाऱ्या देशांवर तर या अरिष्टाचे विपरित परिणाम झाले आहेत. यामुळे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रातील खासगी गुंतवणूक कमी होत आहे. परिणामी लाखो कामगार बेरोजगार होत आहेत. चीन आणि भारत या दोन्ही विकसनशील देशांवरही अरिष्टांचे परिणाम जाणवू लागले आहेत; परंतु याही परिस्थितीत, या दोन्ही देशांनी आर्थिक विकासाचा दर अनुक्रमे ९ टक्के व ६.५ ते ७ टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. अर्थात, एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत कसे बदल होतात, त्यावर चीन आणि भारत यांच्यावरील परिणाम अवलंबून आहे.
मात्र, सध्याच्या पार्श्‍वभूमीवर एक मुद्दा अत्यंत स्पष्ट होत आहे. तो म्हणजे, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक प्रगतीचा दर वाढवू शकली, तरी ती जशी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आपोआप साध्य करू शकत नाही, तसेच योग्य नियमन (रेग्युलेशन) नसेल, तर बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक अरिष्टांचे संकट केवळ स्वसामर्थ्यावर टाळू शकत नाही. त्यासाठी शासनाचा अर्थव्यवस्थेत परिणामकारक हस्तक्षेप असणे अनिवार्य वाटत आहे. अमेरिकेतील आर्थिक अरिष्टाची सुरवातच तेथील नफेखोरीच्या वृत्तीमुळे बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था "अनियंत्रित' (अनरेग्युलेटेड) होण्यामुळे झाली.
अर्थव्यवस्थेची वाढ कुंठित करणारे अनावश्‍यक व जाचक निर्बंध (कंट्रोल्स) नकोत, हे खरे आहे; परंतु त्याबरोबरच केवळ चंगळवाद आणि नफेखोरी करण्यासाठी बॅंकिंग व वित्तीय संस्थांचे नियमन काढून टाकणे वा त्यांनी ते झुगारणे ही गोष्ट आर्थिक अरिष्टाला निमंत्रण देणारी ठरते. आपल्या देशात बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था अरिष्टात न सापडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, आजही त्या दोन्ही क्षेत्रांचे नियमन मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार करते. गरजेनुसार काही प्रमाणात या नियमनाचे स्वरूप बदलण्याची आवश्‍यकता डोळ्याआड करता येणार नाही; परंतु आपल्या देशातील काही मंडळी निर्बंध आणि नियमन यांत फरक करताना दिसत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे.
अकरावी योजना
सरकारने फक्त प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सामुदायिक सेवा पुरविण्यापर्यंतच मर्यादित करावे, उत्पादन क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका काही जण घेताना दिसतात. परंतु, भविष्यात आर्थिक महासत्ता होण्याची शक्‍यता असलेल्या; पण आज मात्र तीस कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली असलेल्या भारतासारख्या देशात उपरोल्लेखित सार्वजनिक सेवा गरिबांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागणार आहे. मात्र, त्याबरोबरच शेती, वीज, सिंचन, रस्ते, गृहबांधणी, ग्रामीण विकास आणि इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देताना स्वतः सरकारनेही काही प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे.
म्हणजेच बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत आर्थिक प्रगतीचा दर वाढविण्यासाठी सरकारने केवळ सहायकाचीच (फॅसिलिटेटर) भूमिका बजावून न थांबता, विकासाभिमुख भूमिका घ्यायला हवी. हीच भूमिका घेत अकराव्या पंचवार्षिक योजनेने "सर्वसमावेशक विकासा'चे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण योजनेच्या तीस टक्के रक्कम फक्त शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होणार आहे. ग्रामीण विकास, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, वीज व पाणीपुरवठा योजना, "इंदिरा आवास योजना', "भारत निर्माण' अशा कार्यक्रमांबरोबरच शेती, सिंचन, फलोत्पादन इ. उत्पादन क्षेत्रातही गुंतवणूक करण्यात येत आहे.

सुखी, समृद्ध जीवनासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज

शाक्‍यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्‌गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्‍तीसाठी आवश्‍यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्‍यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्‍टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्‍क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्‍य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्‍चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्‍य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्‍टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्‍खू तथा भिक्‍खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.'