Sunday 26 April 2009

आरोपी दयानंद पांडेचा पत्रव्यवहार युनोशी

मालेगाव बॉम्बस्फोट खटला प्रकरणातील आरोपी दयानंद पांडे आणि त्याच्या साथीदारांनी स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाशी म्हणजे यूनोशी पत्रव्यवहार केला होता, अशी धक्कादायक माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्या स्वतंत्र राष्ट्राचं नाव आर्यावर्त आहे. या नव्या माहितीमुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटला प्रकरणाचा खुलासा व्हायला मदत होणार आहे.


मालेगाव स्फोटातील आरोपींवर 23 एप्रिल रोजी एक आरोपपत्र दाखल झालं. स्फोटाचा तपास करणार्‍या एटीएसनं हे आरोपपत्र दाखल केलंय. यात काही पत्रं जोडण्यात आलीयत. अयोध्या प्रसाद त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं हे पत्र लिहिलंय. हा इसम स्वत:ला आर्यावर्त सरकारचा प्रवक्ता म्हणवतोय. त्यानं यूनोचे सेक्रेटरी जनरल बान की मून यांना लिहिलेलं पत्र एटीएस नं आरोपपत्रात जोडलंय. काश्मीर मधल्या शारदापीठाच्या वतीनं अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आलीय असंही या पत्रात म्हटलंय. या शारदापीठाचा शंकराचार्य आपण असल्याचा दयानंद पांडे याचा दावा आहे. पांडे याच्या नेतृत्वाखाली अभिनव भारत ही संघटना चालत होती. त्यात लेफ्टनंट कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग या व्यक्ती स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यासाठी यूनोपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला होता याचा पुरावा म्हणून ही कागदपत्रं एटीएसनं सादर केलीत. देशातलं सरकार मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्जिणं आहे. ते आम्हाला मान्य नसून आर्यावर्त या स्वतंत्र हिंदूराष्ट्राची मागण त्यांनी केली होती. तसंच बॉम्बस्फोटानंतर साधवी आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाल्यानंतर त्यांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे त्यांना आपण साथ द्यायला पाहिजे असं परिपत्रकही त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या नावाखाली काढलं होतं.

तुका म्हणे आता ! उरलो वादा पुरता