Sunday 21 June 2009

शिवरायांचे शिक्षण कोणी केले?


खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच "बालभारती'तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा "शिवरायांचे गुरू' म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे "शिक्षक' म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.'' (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील "समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय' साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.'' (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये "शिवाजीची साक्षरता' या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून "आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,' असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.
डॉ. जयसिंगराव पवार

Sunday 14 June 2009

अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर


जुलै १९२० मध्ये "बहिष्कृत हितकारणी' सभेची स्थापना केल्यापासून १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माचा स्वीकार करण्यापर्यंतचा ३६ वर्षांचा काळ हा जातिव्यवस्था आणि अस्पृश्‍यतेच्या समूळ उच्चाटनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाकीपणे केलेल्या संघर्षाचा काळ आहे. केवळ भारताच्याच नव्हे, तर आधुनिक जगाच्या इतिहासातील हा संघर्ष एका अर्थाने अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. भारतातील जाती-वर्ण-अस्पृश्‍यतेवर आधारित विषम समाजव्यवस्थेमुळे येथे सामाजिक समता प्रस्थापित करण्याला डॉ. आंबेडकरांना अग्रक्रम द्यावा लागला. राजकीय लोकशाहीवर त्यांची प्रचंड निष्ठा असली, तरी आर्थिक समता निर्माण केल्याशिवाय सामाजिक समता अर्थपूर्ण ठरू शकत नाही आणि तांत्रिक राजकीय लोकशाही तर निरर्थक ठरते, याबद्दल त्यांना प्रथमपासूनच खात्री होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रहित आणि गरिबांच्या आर्थिक समस्यांशी निगडित असलेल्या सगळ्या आर्थिक समस्यांचा मूलगामी आणि विश्‍लेषणात्मकदृष्ट्या सकस व समृद्ध अभ्यास केला.
कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात "पीएच.डी.' आणि लंडन विद्यापीठातून (सध्याच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स) "डी.एस्सी' मिळविणारे डॉ. आंबेडकर हे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय आहेत. ब्रिटिश कालखंडातील प्रादेशिक वित्तीय व्यवस्थेचा विकास (दि इव्हॉल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा त्यांच्या "पीएच.डी.चा विषय. त्यांचे मार्गदर्शक आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ प्रा. सेलिगमन यांनी या प्रबंधास प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाची थोरवी व्यक्त करताना ते म्हणतात, ""डॉ. आंबेडकरांचा प्रबंध वस्तुनिष्ठ असून आणि त्यांच्या स्वतःच्या देशात घडून येत असलेल्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरांचे (घटनांचे) निःपक्षपाती विश्‍लेषण त्यात आहे. त्यांच्या अभ्यासातून निघणारे निष्कर्ष हे इतर देशांनाही लागू होणारे आहेत.''
"डी.एस्सी'साठी डॉ. आंबेडकरांनी "भारतीय रुपयाची समस्या -स्वरूप आणि उपाय' हा विषय निवडला होता. त्यांचे मार्गदर्शक प्रा. एडविन कॅनन यांनी त्यांच्या अभ्यासाची मुक्तकंठाने स्तुती केली होती. १९१८ मध्ये आंबेडकरांनी भारतातील शेती क्षेत्रासमोरील समस्यांचे मूलगामी विश्‍लेषण केले. १९३६ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यात गरिबांच्या हिताचे कोणते कार्यक्रम असावेत, याचे दिग्दर्शन केले. १९४२ ते १९४६ या काळात कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हिताचे अनेक कायदे करण्यात आणि कार्यक्रम राबविण्यात आणि पुढाकार घेतला. पुढे १९४६ मध्ये "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्‌स फेडरेशन'च्या वतीने घटना समितीस त्यांनी जो मसुदा सादर केला, तो "स्टेट्‌स अँड मायनॉरिटीज' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने शासन व्यवस्थेचे अर्थव्यवस्थेत नेमके कोणते स्थान असावे, याचे मार्गदर्शन केलेले आहे.
शासकीय समाजवाद
डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरण आणि कार्यक्रम हे राज्य घटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजेत. शेतीचे, मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्‍यकतेचा अंतर्भाव असायला हवा. हे कार्यक्रम शाश्‍वत होण्यासाठी त्यांना राज्य घटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा. म्हणजे अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला, तरी त्याला हे कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत.
या योजनेला डॉ. आंबेडकरांनी "घटनात्मक शासकीय समाजवाद' (कॉन्स्टिट्युशनल स्टेट सोशॅलिझम) असे नाव दिले.
गेल्या ७०-८० वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत जे महत्त्वाचे बदल झाले, त्यांचा विचार करता डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या घटनात्मक शासकीय समाजवादाच्या आराखड्याची फेरमांडणी करणे आवश्‍यक आहे. सध्याच्या जागतिक आर्थिक अरिष्टाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शासन आणि बाजारपेठ यांचे अर्थव्यवस्थेत स्थान काय असावे, त्यांची कार्यक्षेत्रे नेमकी कोणती असावीत, त्यांचे परस्परसंबंध कसे असावेत, ते एकमेकांना पर्याय आहेत की पूरक, आर्थिक विकास सर्वसमावेशक करून व त्याचे फायदे गरिबापर्यंत पोचवून कल्याणकारी अर्थव्यवस्था कशी आणता येईल, भाववाढ रोखण्याबरोबरच आर्थिक अरिष्टांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी बेरोजगारी कमी करून रोजगार कसा वाढवता येईल, आदी प्रश्‍नांची जगभर चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने विचार करता डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांतून कोणता निष्कर्ष काढता येणे शक्‍य आहे आणि त्याचे आजच्या जागतिक आर्थिक अरिष्टांच्या संदर्भात काय महत्त्व आहे, हे पाहायला हवे.
सध्याच्या आर्थिक अरिष्टाची सुरवात अमेरिकेतील वित्तीय संस्था आणि शेअर बाजार कोसळण्यापासून झाली. गेल्या २५-३० वर्षांच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्व राष्ट्रीय अर्थव्यवस्था एकमेकींशी पूर्वीपेक्षा खूपच निगडित झाल्यामुळे या अरिष्टाला जागतिक स्वरूप प्राप्त होणे अपरिहार्य होते. निर्यातीवर भर देणाऱ्या देशांवर तर या अरिष्टाचे विपरित परिणाम झाले आहेत. यामुळे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रातील खासगी गुंतवणूक कमी होत आहे. परिणामी लाखो कामगार बेरोजगार होत आहेत. चीन आणि भारत या दोन्ही विकसनशील देशांवरही अरिष्टांचे परिणाम जाणवू लागले आहेत; परंतु याही परिस्थितीत, या दोन्ही देशांनी आर्थिक विकासाचा दर अनुक्रमे ९ टक्के व ६.५ ते ७ टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. अर्थात, एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत कसे बदल होतात, त्यावर चीन आणि भारत यांच्यावरील परिणाम अवलंबून आहे.
मात्र, सध्याच्या पार्श्‍वभूमीवर एक मुद्दा अत्यंत स्पष्ट होत आहे. तो म्हणजे, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक प्रगतीचा दर वाढवू शकली, तरी ती जशी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आपोआप साध्य करू शकत नाही, तसेच योग्य नियमन (रेग्युलेशन) नसेल, तर बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक अरिष्टांचे संकट केवळ स्वसामर्थ्यावर टाळू शकत नाही. त्यासाठी शासनाचा अर्थव्यवस्थेत परिणामकारक हस्तक्षेप असणे अनिवार्य वाटत आहे. अमेरिकेतील आर्थिक अरिष्टाची सुरवातच तेथील नफेखोरीच्या वृत्तीमुळे बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था "अनियंत्रित' (अनरेग्युलेटेड) होण्यामुळे झाली.
अर्थव्यवस्थेची वाढ कुंठित करणारे अनावश्‍यक व जाचक निर्बंध (कंट्रोल्स) नकोत, हे खरे आहे; परंतु त्याबरोबरच केवळ चंगळवाद आणि नफेखोरी करण्यासाठी बॅंकिंग व वित्तीय संस्थांचे नियमन काढून टाकणे वा त्यांनी ते झुगारणे ही गोष्ट आर्थिक अरिष्टाला निमंत्रण देणारी ठरते. आपल्या देशात बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था अरिष्टात न सापडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, आजही त्या दोन्ही क्षेत्रांचे नियमन मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार करते. गरजेनुसार काही प्रमाणात या नियमनाचे स्वरूप बदलण्याची आवश्‍यकता डोळ्याआड करता येणार नाही; परंतु आपल्या देशातील काही मंडळी निर्बंध आणि नियमन यांत फरक करताना दिसत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे.
अकरावी योजना
सरकारने फक्त प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सामुदायिक सेवा पुरविण्यापर्यंतच मर्यादित करावे, उत्पादन क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका काही जण घेताना दिसतात. परंतु, भविष्यात आर्थिक महासत्ता होण्याची शक्‍यता असलेल्या; पण आज मात्र तीस कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली असलेल्या भारतासारख्या देशात उपरोल्लेखित सार्वजनिक सेवा गरिबांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागणार आहे. मात्र, त्याबरोबरच शेती, वीज, सिंचन, रस्ते, गृहबांधणी, ग्रामीण विकास आणि इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देताना स्वतः सरकारनेही काही प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे.
म्हणजेच बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत आर्थिक प्रगतीचा दर वाढविण्यासाठी सरकारने केवळ सहायकाचीच (फॅसिलिटेटर) भूमिका बजावून न थांबता, विकासाभिमुख भूमिका घ्यायला हवी. हीच भूमिका घेत अकराव्या पंचवार्षिक योजनेने "सर्वसमावेशक विकासा'चे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण योजनेच्या तीस टक्के रक्कम फक्त शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होणार आहे. ग्रामीण विकास, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, वीज व पाणीपुरवठा योजना, "इंदिरा आवास योजना', "भारत निर्माण' अशा कार्यक्रमांबरोबरच शेती, सिंचन, फलोत्पादन इ. उत्पादन क्षेत्रातही गुंतवणूक करण्यात येत आहे.

सुखी, समृद्ध जीवनासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज

शाक्‍यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्‌गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्‍तीसाठी आवश्‍यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्‍यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्‍टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्‍क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्‍य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्‍चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्‍य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्‍टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्‍खू तथा भिक्‍खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.'

Wednesday 10 June 2009

इतिहासातील गूढ

इतिहास बदलतो की तसाच राहतो? इतिहास कोण लिहितं आणि कोण बदलतं? प्रश्न गूढ आहेत. ते पुन: पुन्हा विचारले जातात आणि वादाला तोंड फोडतात. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख गाळून ते उत्तम प्रशासक होते, असा बदल इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात यावषीर् केला गेल्यानंतर अशाच एका वादाला तोंड फुटलंय आणि काही जातीय संघटनांच्या दबावाला सरकार बळी पडल्याचा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी वातावरण तापवलंय. वस्तुस्थिती काय आहे?
गेल्या वषीर् पुण्याच्या सचिन गोडांबे या कम्प्युटर इंजिनीयर तरुणाने माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडे एक पत्र पाठवून विचारणा केली होती की, शालेय पाठ्यपुस्तकातील धड्यात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं जे लिहिलेलं आहे त्याला कोणता ऐतिहासिक आधार आहे? त्यावर शिक्षण मंडळाने असं कळवलं होतं की, हा उल्लेख ३७ वर्षांपूवीर्चा असून त्यावेळी कोणता पुरावा लेखकाने वापरला होता याची कल्पना नाही व आता तसा पुरावा देता येत नाही. त्यावर गोडांबेंनी कळवलं की, सरकारकडे पुरावा नसेल तर हा उल्लेख काढून टाकावा. मग सरकारने याबाबतची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्यासाठी इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक समिती नेमली. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असा निर्वाळा दिला. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार हे या समितीचे एक सदस्य होते.
डॉ. पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, ''परमानंदकृत 'शिवभारत' या शिवचरित्राच्या रूपाने अत्यंत विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे. आणि तो नव्याने वगैरे सापडलेला नाही, तो जुनाच आहे. परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी होते. ते पुणेप्रांती आल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना स्वत:चं चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून परमानंदांनी शिवरायांच्या बरोबर राहून त्यांचं चरित्र लिहिलं. शिवबांना वयाच्या बाराव्या वषीर् जिजामातेसह शहाजी राजांनी बेंगळुरूहून पुणेप्रांती पाठवलं तेव्हा त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, मुबलक खजिना अशा गोष्टींबरोबरच काही निष्णात अध्यापकही पाठवल्याचा उल्लेख या 'शिवभारता'त आहे, पण त्यात कुठेही दादोजी कोंडदेवांचं नाव नाही. संपूर्ण 'शिवभारता'त दादोजींचं नाव नाही. १६३० ते १६४७ या शिवरायांच्या जडणघडणीच्या काळात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 'सभासदाची बखर' ही शिवकालीन एकमेव बखर. तिच्यातही दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख नाही. ज्या बखरींमध्ये असे उल्लेख आहेत त्या शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर पुढच्या दीडशे वर्षांत लिहिल्या गेल्या आहेत. एवढंच नव्हे तर शिवकाळातली आदिलशहाची जी फर्मानं आहेत त्यात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख 'मुतालिक' (कारभारी) असाच आहे.''
'शिवभारत'च्या उपलब्ध दोन प्रतींपैकी स. मा. जोशी यांनी तयार केलेली प्रत १९२७ सालीच प्रसिद्ध झाली होती. म्हणजे हा पुरावा ८० वर्षांपूवीर्च उपलब्ध होता. पण तो दुर्लक्षित करून ३७ वर्षांपूवीर्, दादोजी कोंडदेवांचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला, तेव्हा त्यालाही काही पुरावा असू शकेल. भावनांचं राजकारण करणारे राजकारणी आणि आंदोलक यांनी हा वाद नाहक चिघळवण्यापेक्षा, तो पुरावा गोळा करणंच अधिक शहाणपणाचं ठरणार नाही काय? इतिहासाचं गूढ पुराव्यांनी उकलायचं असतं, अस्मिता आणि भावनांनी नव्हे

Friday 5 June 2009

बाल भारतीने केली चुक मान्य

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख नव्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर जुन्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतानाचे छायाचित्रही 'बालभारती'ने वगळले आहे.
दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा 'ऐतिहासिक' निष्कर्ष क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला होता. ह्या निर्णयाला विरोध करीत गजानन मेहेंदळे , निनाद बेडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 'दादोजो कोंडदेव कुलकर्णी' हे शिवरायांचे गुरू होते असे म्हटले होते आणि ह्याला पाठ्य पुस्तकातील पुराव्याचा आधार दिला होता. त्याला उत्तर देताना डॉ. जयसिंगराव पवार , डॉ. वसंतराव मोरे यांनी आवाहन दिले होते की बेडेकर , मेहेंदळे आदी मंडळींनी समकालीन पुरावा सादर करावा, त्यावेळेस बेडेकर ,मेहेंदळे यांच्याकडून एकही पुरावा सादर केला गेला नाही.
आता प्रश्न असा उरतो की जर एकही पुरावा नसेल तर काही इतिहासकारांनी, शाहिरांनी असा खोटा इतिहास का मांडला? बर जर चुक झाली तर हे लोक का स्वीकारत नाहीत की एकही समकालीन पुरावा नाही म्हणून?
ह्या लढ्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव पवार आणि सर्व संघटना ज्यांनी ज्यांनी हा खरा इतिहास समोर आणला त्या सर्वांचे आभार आणि शिवरायांना माफी मागतो की आपला खरा इतिहास लोकांसमोर आणण्यास आम्हाला उशीर झाला.
इतिहासातील अनेक साहित्यांत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे पुरावे सापडत नाहीत. शहाजी महाराज आणि जिजामाता यांनीच शिवाजीराजांना सर्व प्रशिक्षण दिले आहे. किंबहुना, शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा म्हणजे शहाजी महाराज आणि जिजाबाईच आहेत. काही इतिहासकारांनी आजवर अतिशय खोटा आणि अप्रस्तुत असा इतिहास लोकांसमोर मांडला होता; पण वस्तुस्थिती तशी नाही. दादोजी हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होते; पण ते शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कार बंद झाला. आता इतिहासाच्या पुस्तकातूनही त्यांचे नाव वगळले गेले असल्याने, लाल महालात असणारे त्यांचे शिल्पही महापालिकेने काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.