Tuesday 15 December 2009

डॉ. जयसिंगराव पवार यांचे श्यामसुंदर मुळे यांना प्रत्युत्तर:

लोकप्रभात प्रसिध्द झालेल्या ‘चौथीची इतिहास बखर’ या श्यामसुंदर मुळे यांच्या लेखाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिलेले प्रत्युत्तर...

गेल्या जूनमध्ये बालभारतीने इयत्ता चौथी इतिहासाचे ‘शिवछत्रपती’ हे पाठय़पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातील ‘शिवरायांचे शिक्षण’ या पाठात त्यांचे शिक्षण शहाजीराजे व जिजाबाई यांच्या देखरेखीखाली झाले आणि ते शहाजीराजांनी नेमलेल्या विख्यात शिक्षकांनी केले, अशी समकालीन पुराव्याच्या आधारावर इतिहासाची पुनर्माडणी केली होती. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजी कोंडदेवांनीच केले, असे मानणाऱ्या प्रस्थापित इतिहासाच्या कैवाऱ्यांनी या पुनर्माडणीविरुद्ध मोठे रान उठविले. त्यामध्ये पुस्तकात घातलेला नवा मजकूर बिनपुराव्याचा आहे, या आरोपापासून पुस्तकात दादोजींचे नावच वगळले आहे, त्यांना शिवरायांच्या गुरुपदावरून हटवले आहे. इथपर्यंत दादोजी समर्थकांनी मजल मारली. त्यापैकी अनेक जणांनी हे पुस्तकही पाहिले नव्हते.

वास्तविक जुन्या पुस्तकात कुठेही दादोजींचा उल्लेख शिवरायाचे ‘शिक्षक’ अथवा ‘गुरू’ म्हणून नव्हता. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्नच नव्हता. पूर्वीच्या पुस्तकातील दादोजींचा शहाजीराजांना इमानी, न्यायी, एकनिष्ठ, कडक शिस्तीचा व चोख कारभार करणारा सेवक म्हणून असलेला उल्लेख जसाच्या तसा ठेवला होता. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजींच्या देखरेखीखाली झाले हा उल्लेख वगळून ते शहाजीराजे व जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, असा बदल केल्यामुळे दादोजी समर्थकांनी एकच हलकल्लोळ माजविला.तेव्हा दादोजी समर्थकांच्या सर्व आक्षेपांचे पुराण्यानिशी खंडन करणारे तीन लेख मी २१ जून ०९ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध केले. त्यानंतर या लेखांच्या विरोधात, माझ्या मुद्दय़ांचे खंडन करणारी कोणाचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. परवाच्या ‘लोकप्रभा’त मात्र (दि. २७ नोव्हें.) श्यामसुंदर मुळे यांनी एक प्रदीर्घ लेख लिहून आपली प्रतिक्रिया बऱ्याच उशिरा का होईना दिली आहे. प्रस्तुतचा लेख त्यांच्या प्रतिक्रियेविषयी आहे.

मुळेंच्या लेखाचे उद्देश

मुळेंच्या लेखाचे दोन मुख्य उद्देश दिसतात. पहिला म्हणजे जयसिंगराव पवार यास ‘टारगेट’ करून त्यांनी चौथीच्या पुस्तकाची ‘बखर’ कशी केली आहे, हे सांगणे आणि दुसरा म्हणजे ज्या ‘शिवभारत’ या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इतिहासाची पुनर्माडणी केली आहे, तो ग्रंथच कसा अधिकृत अतएव विश्वसनीय नाही, हे वाचकाच्या मनावर बिंबवणे.खरे तर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक होते, अगर गुरू होते, हे सिद्ध करणे हे मुळेंचे तिसरे उद्दिष्ट असायला हवे होते, पण त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची काहीही मांडणी केलेली नाही. शिवभारतासारख्या शिवकालातील ग्रंथाच्या कर्त्यांने म्हणजे कवींद्र परमानंदाने ‘दादोजी कोंडदेवाला अनुल्लेखाने मारल्या’ने आणि जयसिंगराव पवारांनी त्याच ग्रंथाच्या आधारावरून दादोजींना शिवरायांच्या शिक्षक पदावरून (की गुरुपदावरून?) हटविल्यामुळे ते ‘सखेदाश्चर्य’ व्यथित झाले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेचे खरे कारण हे होय.

ही कोण नीती?

प्रथमत: एक लक्षात घेतले पाहिजे की या पुस्तकासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्याचे संपूर्ण पुनर्लेखन केलेले नाही. बालभारतीकडे गेली अनेक वर्षे या पुस्तकाविषयी ज्या तक्रारी व सूचना आल्या होत्या, त्यांचा विचार करून आवश्यक तो बदल करणे एवढेच समितीस अभिप्रेत होते. तसे पुनर्लेखन समितीने केले आहे. तथापि समितीने सर्वच पुस्तक लिहून काढले आहे, असे गृहीत धरून मुळे यांनी टीका केली आहे. उदा. शिवरायांचे सईबाईशी लग्न, बाजीप्रभूंचा पराक्रम इत्यादी.दादोजींच्या संदर्भात त्यांची प्रतिमा डागाळेल, असा कोणताही मजकूर आम्ही नव्याने घातलेला नाही. उलट त्यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी देणारा जुन्या पुस्तकातील मजकूर आम्ही गाळला आहे. जुन्या पुस्तकात शिवरायांचा स्वराज्याचा उद्योग पाहून दादोजी म्हणतात, ‘‘राजे, सुलतानाचे बळ प्रचंड! त्यांच्याविरुद्ध तुम्ही उठाव करणार? तुम्ही लहान. तुमची शक्ती लहान. म्हणून भीती वाटते इतकेच!’’ दादोजींचा मुळातच शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीला विरोध होता, असे मत जे लोक मांडतात, त्यांना हा मजकूर पुष्टी देणारा ठरतो; त्यामुळे दादोजींची प्रतिमा नकळत मलिन होते, म्हणून तो मजकूर आम्ही नव्या पुस्तकात गाळला. याबद्दल एका शब्दानेही दादोजीसमर्थक समितीचे आभार मानत नाहीत; उलट दादोजींच्या कामगिरीचे महत्त्व सांगणारा परिच्छेद आम्ही ठेवला आहे, तो आमच्यावर ‘जातीयतेचा आरोप’ येऊ नये म्हणून ठेवला आहे, असा आरोप करतात, ही गोष्ट कोणत्या नीतीत बसते? ते कसे काय सिद्ध होते?

पण या किरकोळ गोष्टी आहेत. मुळे यांचा माझ्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे तो मी दादोजींबद्दल माझे पूर्वीचे मत बदलेले म्हणून. माझे पूर्वीचे मत वाचकांना कळावे, यासाठी त्यांनी मी ३०-३२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पुस्तकातील अनेक उतारे उद्धृत केले आहेत आणि गमतीची बाब अशी की, शेवटी त्यांनी एखादे ऐतिहासिक सत्य सापडल्याच्या आविर्भावात विचारले आहे, ‘‘वरील उताऱ्यांवरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे शिक्षक होते हे सिद्ध होत नाही काय?’’ते कसे काय सिद्ध होते? या उताऱ्यांवरून माझे पूर्वीचे मत आता बदलले आहे, हे स्पष्ट होईल. पण माझे हे मत तुमचा ऐतिहासिक पुरावा कसा होतो? एखाद्या लेखकाचे मत म्हणजे पुरावा नव्हे! ज्यांच्या आधारावर इतिहास रचला जातो, ती साधने म्हणजे पुरावा हा इतिहासशास्त्राचा साधा नियम आहे. आणि समजा माझे एके काळचे मत हाच तुमचा पुरावा ठरत असेल, तर आताचे माझे बदलेले मत तुमचा पुरावा का होत नाही? खरे तर कोणत्याही लेखकाचे सर्वात अलीकडचे मत ग्राह्य़ धरावयास हवे. पण मुळे तसे मानत नाहीत. कारण ते त्यांच्या विरोधात जाते.माझ्या पूर्वीच्या मताच्या संदर्भात मुळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वीही अनेक लोक दादोजी हे शिवरायांचे ‘गुरू’ नव्हते असे म्हणत असता त्यांच्या मताची दखल मी का घेतली नाही? पूर्वीचे मत बदलण्यास मला ३०-३२ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी का लागला? (माझ्या जून ०९ मधील लेखांना उत्तरे द्यावयास मुळेंनी ५ महिने का घेतले, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो!) आता वादाकरिता आपण गृहीत धरू की मुळेंच्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना हवी तशी दिली आणि त्या सर्वाचा दोष मी स्वीकारला, तरी मूळ मुद्दा ‘दादोजी शिवरायांचे शिक्षक होते’, हा कसा काय सिद्ध होतो? मी माझे मत केव्हा बदलले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पुराव्यावरून बदलले हे महत्त्वाचे आहे.

मुळे यांचे अपूर्व धाडस

या संदर्भात मुळे यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की त्यांनी माझ्यावर शरसंधान करण्यासाठी माझ्या जुन्या पुस्तकाचे आयुध वापरले आहे, ते गेल्या दीड-दोन वर्षांत अनेकांनी वापरून बोथट झालेले आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार आणि चौथी इतिहास यांच्या संदर्भात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांनी आपल्या मुलाखतीत व लेखांत माझ्या जुन्या पुस्तकातील उतारे उद्धृत केले होते आणि ‘पवारांना आताच कसा काय साक्षात्कार झाला?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. पण यापैकी कुणीही माझे नवे मत ज्या शिवभारत ग्रंथावर आधारित आहे, त्या ग्रंथास ‘अनधिकृत’ अथवा ‘अविश्वसनीय’ म्हटलेले नाही. पण तसे म्हणण्याचे अपूर्व धाडस मुळे यांनी दाखवले आहे!मुळे यांनी याहून मोठे धाडस दाखविले आहे ते, शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी राजमाता जिजाऊ दरबारात कशावरून हजर होत्या, हा प्रश्न विचारून! हाही प्रश्न आतापर्यंत कुणी विचारला नव्हता. पुढे ते आणखी प्रश्न करतात की शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, याला तरी पुरावा काय? महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातील ज्या महान मातेने आपल्या युगकर्त्यां पुत्राची जडणघडण केली, हिंदवी स्वराज्याचे व सार्वभौम मऱ्हाटा राजपदाचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न साकार होत असता राज्याभिषेक प्रसंगी ती माता दरबारात हजर असणार नाही तर कुठे असणार? रायगडावरील एखाद्या महालात दारे बंद करून त्या बसतील काय? त्यांचे दरबारात उपस्थित असणे ज्ञात इतिहासाशी सुसंगत नव्हे काय?

जिजाऊ शिवरायांची सावली

कर्नाटकातील जहागिरीतून पुणे जहागिरीत आल्यावर शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली चालूच राहिले, या पाठय़पुस्तकातील विधानामुळे मुळे फारच व्यथित झाले आहेत. शिवभारतात तसा उल्लेख नसता असे विधान केलेच कसे, किंवा त्याचे संदर्भ जयसिंगरावांनी कुठून मिळवले असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.शिवाजी महाराजांसारखा महापुरुष जिजाबाईंनी घडविला, या त्यांच्या कामगिरीत त्यांच्या शिक्षणावरील देखरेख ही फारच मामुली गोष्ट आहे. शिवरायांच्या जीवनात त्या त्यांच्या संरक्षक देवता म्हणून राहिल्या आहेत, असे तमाम शिवचरित्रकार म्हणत आले आहेत. पण श्यामसुंदर मुळे यांना त्याचा पुरावा हवा आहे. ऐतिहासिक संदर्भ हवे आहेत. तेव्हा शिवरायांच्या शिक्षणावर देखरेखच नव्हे, तर त्यांची सावलीप्रमाणे सोबत जिजामातेने केल्याचा दाखलाच आम्ही येथे सादर करत आहोत.शहाजीराजांच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे या पंडिताने ‘राधामाधवविलासचंपू’ नावाचे एक शहाजीचरित्र रचले आहे.

त्यामध्ये शहाजीराजासारख्या पराक्रमी पुरुषास जिजाईसारखे स्त्रीरत्न कसे शोभून दिसत होते आणि जिजाईची कीर्ती सर्व भरतखंडात कशी पसरली होती, याचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘‘जशी चंपकेशी खुले फुलल जाई। भली शोभली ज्यास जाया जिजाई ।। जिचे कीर्तिचा चंबु जंबुद्विपाला। करी साऊली माऊलींसी मुलाला।।’’जयराम पिंडेच्या या कवनावर भाष्य करताना इतिहासाचार्य राजवाडय़ांनी म्हटले आहे, ‘‘जिजाई ही शहाजीसारख्या धीर, उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि.. स्वत:च्या धीर, उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काळी सर्व भरत खंडभर पसरली होती. इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या.. सावलीखाली सर्व जंबुद्विपातील सज्जन लोक यवनाच्या जुलूमाला कंटाळून आश्रयार्थ येत असत, असे जयराम लिहितो. (यावरून) जिजाई ही कोणत्या तोलाची बाई होती, याचा अंधुक तर्क जयरामाच्या या समकालीन उक्तीवरून करता येतो. पुणे व सुपे प्रांताची व्यवस्था पाहणाऱ्या, शिवाजीच्या शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या, स्वत: गोरगरिबांचा समाचार घेणाऱ्या व गुणी सज्जनांना आश्रय देणाऱ्या या बाईच्या कर्तबगारीचे तपशीलवार वर्णन न देता केवळ एक त्रोटक श्लोक करून कवी गप्प बसला, हे पाहून कवीवर संशोधकांचा राग झाल्यास तो अयथार्थ होणार नाही.’’इतिहासाचार्याच्या भाष्यानंतर माझ्यासारख्याने काही म्हणण्याची गरज नाही, इतके ते मार्मिक आहे. याउपरीही श्यामसुंदरांना जिजाऊंच्या शिवरायांच्या शिक्षणावरील पुरावा हवा असेल तर आम्हीच त्यांना विचारतो की, शिवरायांच्या शिक्षणावर अन्य कोणाची देखरेख होती असे सांगणारा एखादा समकालीन पुरावा त्यांनी सादर करावा.

मुळे यांचा खरा राग

मुळे यांचा खरा राग आहे तो आम्ही शिवरायांचे शिक्षण दादोजींनी केले, याला समकालीन पुरावा मागितल्याबद्दल आणि समकालीन कागदपत्रांत तो उपलब्ध नसल्याने दादोजींना शिक्षक पदावरून हटविल्याबद्दल. खरे म्हणजे दादोजींनी शिक्षण केले यास समकालीन पुरावा नाही, हे एकच कारण त्यासाठी नाही; तर शिवरायांचे शिक्षण कोणी केले, कोणकोणत्या विद्या व कला त्यांनी शिकवल्या याविषयी स्पष्ट निर्देश परमानंदाने शिवभारतात केला आहे. त्यामुळे शिवरायांच्या शिक्षणाचे, विद्यादानाचे श्रेय त्या शिक्षकांना दिले पाहिजे, अन्य कुणास नाही, असा विचार तज्ज्ञ समितीने केला. त्यामागे कोणताही आकस नाही.शहाजीराजांनी बंगळूरहून पाठवून दिलेल्या ‘विख्यात अध्यापक’ वर्गाने शिवरायाचे शिक्षण केले, असे परमानंद सांगतो तर त्यांची नावे का देत नाही, असे मुळे विचारतात. २१व्या शतकात असा प्रश्न कुणी उपस्थित करेल, अशी पूर्वकल्पना परमानंदास असती तर त्याने ती दिली असती! दुसरे असे की शिवरायांना शिकवलेल्या विविध कला व शास्त्रे यांची यादी एवढी मोठी आहे की ती शिकवणाऱ्या अध्यापकांच्या नावाची लांबलचक यादी देणे त्याने टाळले असावे. पण नावे दिली नाहीत म्हणून परमानंदाची साक्षच खोटी असे होत नाही.

पुरंदरे-मेहेंदळे काय म्हणतात?

कविंद्र परमानंदाचे ‘शिवभारत’ हे कसे अव्वल दर्जाचे विश्वसनीय साधन आहे, हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तसा अवकाश येथे नाही. म्हणून मी महाराष्ट्रातील फक्त दोन विख्यात शिवचरित्रकारांची शिवभारतासंबंधीची मते उद्धृत करत आहे.पहिले आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ते म्हणतात, ‘‘माझा अंदाज आहे की शिवाजी महाराजांच्या बालपणापासून परमानंदाचा व भोसले घराण्याचा संबंध असावा. (बहुधा १६३५ च्या पुढे) तो आपल्या संपूर्ण लेखनात जे बारकावे देतो ते इतके विश्वसनीय आहेत की तितक्या बारकाव्यानिशी लिहिणारा हा मनुष्य जास्त जवळचा संबंध असल्याखेरीज इतके अचूक लिहू शकणार नाही. आपण शिवभारताचा तौलनिक अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, अस्सल पर्शियन कागदपत्रांतून किंवा मराठी कागदपत्रांतून, जेधे शकवलीसारख्या कागदपत्रांतून जी माहिती आपणाला मिळते तशीच माहिती हा परमानंद कवी शिवभारतात लिहितो. त्यामुळे तो एक साधनग्रंथ बनला आहे.. एकंदरीत परमानंदाचा आणि शिवाजीमहाराजांचा मोठा सहवास होता, असे दिसते. त्यामुळे परमानंदांनी लिहिलेले, ‘शिवभारत’ अतिशय विश्वसनीय माहितीपूर्ण आहे.’’दुसरे शिवचरित्रकार मेहेंदळे यांनी म्हटले आहे : ‘‘शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे.. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास येत असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही.’’

मुळे यांचा अजब न्याय

आता ‘शिवभारत’विषयी मुळे काय म्हणतात पाहा- ‘‘जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ हे शिवाजीचे अधिकृत चरित्र नव्हे. कारण त्यामध्ये इ. स. १६३० ते १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आला आहे. शिवाजीचा ३१ वर्षांपर्यंतचाच इतिहास ‘शिवभारत’ मध्ये असल्याने शिवाजीचे उर्वरित १९ वर्षांचे आयुष्य समजून घेण्यासाठी अन्य ऐतिहासिक साधनांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ला अधिकृत चरित्र कसे मानता येईल?’’शिवभारतासारख्या समकालीन अव्वल साधनास ‘अनधिकृत’ ठरविण्यासाठी मुळे यांनी केलेला खटाटोप थक्क करणारा आहे! त्यांचे मत मान्य केले तर पुरंदरे-मेहेंदळे या शिवचरित्रकारांना इतिहासशास्त्रातील काही समजत नाही, असे मानावे लागेल! हे खरे की इतिहास संशोधक दिवेकर यांना शिवभारताचे हस्तलिखित त्रुटित स्वरूपात मिळाले. एकूण ३२ अध्यायात शेवटच्या अध्यायाचे तर नऊच श्लोक उपलब्ध झालेत. पुढचे श्लोक व अध्याय भविष्यात सापडणारच नाहीत असे नाही. तसे ते सापडले तरच मुळे शिवभारताला अधिकृत मानणार, नाहीतर ते अनधिकृत समजणार! मुळेंच्या इतिहासशास्त्रातील हा मोठा अजब न्याय आहे.‘शिवभारत’ हे अधिकृत शिवचरित्र एवढय़ासाठी मानले जाते की त्यातील अनके घटना, तारखा व व्यक्ती याविषयीची विश्वासार्हता प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुद्द परमानंद हा शिवाजी महाराजांच्या सहवासातील असून त्यांच्या आदेशानेच त्याने हे चरित्र रचले आहे! याशिवाय शिवभारताच्या अधिकृतपणाला आणखी काय पुरावे हवेत? पण झोपी गेलेल्यास जागे करता येते, सोंग घेणाऱ्यास नाही?अशा प्रकारच्या समकालीन विश्वसनीय पुराव्याच्या आधारे पुनर्लेखन केलेल्या चौथी इतिहासाच्या पाठय़पुस्तकास ‘जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली बखर’ म्हणून हिणवावे, हे दुर्दैव आहे. ज्या बखरींच्या आधारावर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक म्हणून ते पुढे आणू इच्छितात, त्याच बखर वाङ्मयास त्यांनी कमी लेखावे, हे बरे नव्हे.

मुळे यांना आवाहन

मुळे यांनी आपल्या प्रदीर्घ लेखात, जयसिंगराव पवारांनी आपली मते कशी बदलली, त्यांनी आपले नवे मत ज्या शिवभारताच्या आधारे मांडले आहे, ते कसे अधिकृत नाही, जिजाईंनी शिवरायांच्या शिक्षणावर देखरेख कशावरून केली, त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी दरबारात कशावरून हजर होत्या, असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर साद्यंत चर्चा केली आहे. तथापि त्यांनी अशी चर्चा करण्यापेक्षा दादोजी कोंडदेवांनी शिवरायास अमुक एक विद्या वा कला शिकवल्याचा दोन ओळींचा अस्सल समकालीन पुरावा सादर केला असता तर माझ्यावरच नव्हे तर सर्व महाराष्ट्रावर उपकार झाले असते. म्हणजे दादोजी शिवरायांचे शिक्षक होते की नव्हते, हा वाद कायमचा निकालात निघाला असता. माझे श्यामसुंदर मुळे यांना आवाहन आहे की, त्यांनी अशा पुराव्याचा अवश्य शोध घ्यावा आणि तो पुरावा महाराष्ट्राच्या समोर मांडावा. तसे झाले तर आम्ही आमच्या मतात जरूर सुधारणा करू आणि चौथीच्या पुस्तकातही ती अमलात आणू. त्यासाठी दुराग्रही असण्याचे कारण नाही.कारण इतिहास हे एक प्रवाही शास्त्र आहे. जसजशी नवनवीन साधने शोधली जातात, जसजशी नवनवीन दृष्टिकोनातून त्यांची चिकित्सा व मांडणी होते, तसतसा तो बदलत जातो. तो तसा बदलत जाणे हे त्याच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे लक्षण आहे. एके काळी बखरी प्रमाणभूत मानून इतिहासकारांनी शिवाजी- रामदास भेट इ. स. १६४९ मध्ये निश्चित केली होती. पुढे गोविंदराव चांदोरकर, प्रा. न. र. फाटक प्रभृतींनी त्यांची भेट इ. स. १६७२ पर्यंत झालीच नव्हती, हे कागदपत्राच्या आधारे सिद्ध केले. आज त्यांचे मत सर्वमान्य झाले आहे. ५०-६० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीराजे म्हणजे मद्यपी, व्यभिचारी व राज्यबुडवा राजा म्हणून मराठी इतिहास व साहित्य यामध्ये प्रतिमा होती. बेंद्रे, गोखले, पगडी प्रभृतींनी आपल्या संशोधनाने इतिहासाची पुनर्माडणी करून संभाजी राजांची एक तेजस्वी व पराक्रमी प्रतिमा महाराष्ट्रासमोर आणली. आज ती प्रतिमा मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय बनला आहे. इतिहासाची पुनर्माडणी करण्याचा प्रत्येक पिढीला अधिकार असतो. नव्हे तो असायलाच हवा. पण अशी मांडणी भरभक्कम पुराव्याच्या आधारे करायला हवी, हेही तेवढेच खरे.मुळे यांनी भावनेच्या भरात मी केलेल्या इतिहासाच्या पुनर्माडणीबद्दल ‘‘इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही.’’ अशी शापवाणी उच्चारली आहे. पण इतिहासाची अशी साक्ष आहे की फाटक, बेंद्रे, गोखले, पगडी या इतिहासकारांना इतिहासाने केवळ क्षमाच केली नाही तर त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविले आहे. मी या मोठय़ा इतिहासकारांच्या पंगतीत बसत नाही, याची मला जाणीव आहे. पण इतिहास मला क्षमा करेल की शिक्षा करेल, हे काळच ठरवील, श्यामसुंदर मुळे नव्हे!