Saturday 30 May 2009

शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

समितीत पुरंदरे नकोत


राज यांच्या टिकेला प्रत्युत्तर


Sunday 24 May 2009

ग्रंथदिंडी, मिरवणुकीने मध्य नागपूर दणाणले



नागपूर - जय शिवाजी व जय जिजाऊचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात असंख्य आकर्षक चित्ररथांचा समावेश असलेल्या मिरवणूक व ग्रंथदिंडीने आज मध्य नागपूर दुमदुमले. मराठा साहित्य समंलेनाच्या पूर्वसंध्येला जगदगुरू तुकोबारायांच्या चतुर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या या दिंडीत लहानथोरांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
ग्रंथदिंडीची सुरुवात महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी डॉ. देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची पूजा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, विभागीय अध्यक्ष मधुककराव मेहकरे, कॉंग्रेसचे माजी नेते मुकुंदराव पन्नासे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वर रक्षक, रमेश बोरकुटे, चंद्रशेखर चांदेकर, संजय शेंडे, प्रदीप शेंडे, डॉ. शांतिदास लुंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी झेंडा चौक (धरमपेठ), लक्ष्मी भवन चौक, शंकरनगर, सिमेंट रोड, रामनगर, गोकुलपेठ, लॉ कॉलेज चौकमार्गे जाऊन डॉ. देशपांडे सभागृहात समारोप झाला. दिंडीत संत तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख, जैमिनी कडू यांच्यासह अनेक प्रसिद्ध लेखकांचे जवळपास दीडशे ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत बाल शिवाजी, जिजाऊ, तुकारामांची वेशभूषा असलेले कलाकार, भजन मंडळ, लेझीम पथकासह सहा आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता.
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने पाचवे मराठा साहित्य संमेलन उद्या (ता. 23) पासून डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद महाकवी सुधाकर गायधनी भुषवणार असून, उद्‌घाटन पंढरपूरच्या कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब लुंगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श. नू. पठाण, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.उद्‌घाटनानंतर सार्वकालीक संत तुकाराम महाराज आणि साहित्यातील मराठा स्त्री या विषयांवर चर्चासत्र होईल. यात विचारवंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्रा. ज्ञानेश वाकुडकर व परभणीचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुख्य उपस्थितीत कविसंमेलन होईल.

समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर

नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
पुरंदरेंना हटवा
मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.

संत तुकाराम जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते - प्रा. अशोक राणा

नागपूर - मराठी साहित्यक्षेत्रात उंची गाठलेले संत तुकाराम सत्यनिष्ठ, करुणाप्रिय, निसर्गप्रेमी, स्त्री आणि शेतकऱ्यांचा आदर करणारे होते. तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज मुक्‍त केले. म्हणून ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक व प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक राणा यांनी आज येथे व्यक्‍त केले. सिव्हिल लाइनस्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन झाले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात "सार्वकालिक संत तुकाराम महाराज' या विषयावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी मत व्यक्‍त केले.
चर्चासत्राला गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. विचारपीठावर बाळासाहेब पन्नासे, डॉ. साहेबराव खंदारे, गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्‍वर रक्षक, डॉ. मिलिंद माने, प्रा. बलदेव आडे, डॉ. अशोक येंडे आदी उपस्थित होते.
प्रा. राणा म्हणाले, वारकरी परंपरा नामदेवापासून तुकारामापर्यंतचा प्रवास आहे, हे आम्ही आधी समजून घेतले पाहिजे. तुकारामांना शेतकऱ्यांचा कळवळा होता. सरकारने शेतकऱ्यांना आज कर्जमुक्‍त केले. मात्र, तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच कर्जदारांची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्‍त केले होते. ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते आहेत. संत तुकारामांना स्त्रियांबद्दलही आदरभाव होता. त्यांचा स्त्री दाक्षिण्य हा गुण खूप प्रभावित करणारा होता. तुकारामांनी निसर्गावरही खूप प्रेम केले. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून त्यांचे निसर्गप्रेम व्यक्‍त होते.
प्रा. राणा पुढे म्हणाले, गौतमबुद्धांचा त्यांच्यावर फारच प्रभाव होता. बुद्धांचा करुणा हा गुण त्यांना खूप आवडला. तो त्यांनी आचरणातही आणला. मात्र, काहीप्रसंगी त्यांचा कठोरपणाही अभंगातून दिसून येतो. एकीकडे सत्यावर त्यांची अपार निष्ठा होती, तर दुसरीकडे असत्याबद्दल चिडही व्यक्‍त केली. तुकारामांचे व्यवहारकौशल्य इथेच थांबत नाही. संसारासाठी पैसा आवश्‍यक आहे, हे त्यांनी "जोडुनिया धन उत्तर व्यवहारे' या अभंगाद्वारे पटवून सांगितले. त्यांनी देवी-देवतांनाही विरोध केला. कारण अधिक देवी-देवतांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली. युद्ध व सैनिकांना उद्देशून त्यांनी लिहिलेले अभंग त्यांच्या आधुनिक विचारांचे प्रतीक असल्याने ते खऱ्या अर्थाने विश्‍वव्यापी व सार्वकालिक संत असल्याचे त्यांनी सांगितले.
रामनाथ नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकारामांचे महात्म्य सांगून, मराठी भाषेला केवळ महाराष्ट्रापुरती संकुचित ठेवू नये, असा सल्ला दिला. त्यांनी आपल्या भाषणातून गोवावासीयांच्या मनातील खदखद बोलून दाखविली. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषद या कट्टर हिंदू संघटनेने गोव्याचे फार नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साहेबराव खंदारे यांनी संत तुकाराम एका भाषेत बंदिस्त होऊ शकत नसल्याचे सांगून त्यांच्या अभंग व साहित्याला वैश्‍विक संबोधले. सूत्रसंचालन माधवी शिंदे व ज्योती मोहरकर यांनी व्यक्‍त केले.

शिव स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून पुरंदरे यांना हटवा: पुरुषोत्तम खेडेकर