Sunday 24 May 2009

संत तुकाराम जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते - प्रा. अशोक राणा

नागपूर - मराठी साहित्यक्षेत्रात उंची गाठलेले संत तुकाराम सत्यनिष्ठ, करुणाप्रिय, निसर्गप्रेमी, स्त्री आणि शेतकऱ्यांचा आदर करणारे होते. तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज मुक्‍त केले. म्हणून ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक व प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक राणा यांनी आज येथे व्यक्‍त केले. सिव्हिल लाइनस्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन झाले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात "सार्वकालिक संत तुकाराम महाराज' या विषयावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी मत व्यक्‍त केले.
चर्चासत्राला गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. विचारपीठावर बाळासाहेब पन्नासे, डॉ. साहेबराव खंदारे, गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्‍वर रक्षक, डॉ. मिलिंद माने, प्रा. बलदेव आडे, डॉ. अशोक येंडे आदी उपस्थित होते.
प्रा. राणा म्हणाले, वारकरी परंपरा नामदेवापासून तुकारामापर्यंतचा प्रवास आहे, हे आम्ही आधी समजून घेतले पाहिजे. तुकारामांना शेतकऱ्यांचा कळवळा होता. सरकारने शेतकऱ्यांना आज कर्जमुक्‍त केले. मात्र, तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच कर्जदारांची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्‍त केले होते. ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते आहेत. संत तुकारामांना स्त्रियांबद्दलही आदरभाव होता. त्यांचा स्त्री दाक्षिण्य हा गुण खूप प्रभावित करणारा होता. तुकारामांनी निसर्गावरही खूप प्रेम केले. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून त्यांचे निसर्गप्रेम व्यक्‍त होते.
प्रा. राणा पुढे म्हणाले, गौतमबुद्धांचा त्यांच्यावर फारच प्रभाव होता. बुद्धांचा करुणा हा गुण त्यांना खूप आवडला. तो त्यांनी आचरणातही आणला. मात्र, काहीप्रसंगी त्यांचा कठोरपणाही अभंगातून दिसून येतो. एकीकडे सत्यावर त्यांची अपार निष्ठा होती, तर दुसरीकडे असत्याबद्दल चिडही व्यक्‍त केली. तुकारामांचे व्यवहारकौशल्य इथेच थांबत नाही. संसारासाठी पैसा आवश्‍यक आहे, हे त्यांनी "जोडुनिया धन उत्तर व्यवहारे' या अभंगाद्वारे पटवून सांगितले. त्यांनी देवी-देवतांनाही विरोध केला. कारण अधिक देवी-देवतांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली. युद्ध व सैनिकांना उद्देशून त्यांनी लिहिलेले अभंग त्यांच्या आधुनिक विचारांचे प्रतीक असल्याने ते खऱ्या अर्थाने विश्‍वव्यापी व सार्वकालिक संत असल्याचे त्यांनी सांगितले.
रामनाथ नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकारामांचे महात्म्य सांगून, मराठी भाषेला केवळ महाराष्ट्रापुरती संकुचित ठेवू नये, असा सल्ला दिला. त्यांनी आपल्या भाषणातून गोवावासीयांच्या मनातील खदखद बोलून दाखविली. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषद या कट्टर हिंदू संघटनेने गोव्याचे फार नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साहेबराव खंदारे यांनी संत तुकाराम एका भाषेत बंदिस्त होऊ शकत नसल्याचे सांगून त्यांच्या अभंग व साहित्याला वैश्‍विक संबोधले. सूत्रसंचालन माधवी शिंदे व ज्योती मोहरकर यांनी व्यक्‍त केले.

No comments: