Wednesday 28 January 2009

तालिबानचे भाउबंद-1

कर्नाटकातील मंगलोरमधील एका पबमध्ये श्रीराम सेना नावाच्या एका संघटनेने शनिवारी जो हैदोस घातला, तो पाहता भारतातही तालिबानींचे अवतार जन्माला येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्माच्या संरक्षणाच्या नावाखाली लोकांवर निर्बंध घालायचे आणि ते न पाळणाऱ्यांना मारहाण करायची, प्रसंगी मुलींचा विनयभंग करायचा, असे प्रकार करणाऱ्यांना सहिष्णू आणि पुरोगामी भारतीय समाज थारा देणार नाही. पण दहशत निर्माण करून असे प्रकार सुरू झाले की समाजच घाबरून जातो. त्यामुळे या धामिर्क अतिरेकी प्रवृत्तींना सरकार नावाच्या यंत्रणेनेच पायबंद घालायला हवा.
मंगलोरमधील घटनेचा कर्नाटक सरकारने आणि भारतीय जनता पक्षाने निषेध केला असला तरी या प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करायला हवी. पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. मात्र पबमध्ये एकत्र येऊन हैदोस घालण्यात आल्याने संघटित गुन्हेगारीच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत. तसे केले तरच त्या संघटनेवर कारवाई करणे शक्य होईल. अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या काही भागात तालिबानी मंडळींनी गोंधळ घातला आहे. मुस्लिम मुलींनी शिक्षण घेऊ नये, मुलांनी केवळ लष्करी शिक्षण घ्यावे, पुरुषांनी मानवी बॉम्ब बनावे, स्त्रियांनी कायम पडद्याआड राहावे, स्त्रीने मनात प्रेमाची भावना ठेवू नये, घराबाहेर एकट्याने पडू नये, आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर पडतानाही गळ्यात तालिबानी परवाना घालावा, पुरुषांनी दाढी काढू नये, पायजमा थेट पायापर्यंत येऊ देऊ नये, असे त्यांचे फर्मान आहे. गेल्याच आठवड्यात पायघोळ पायजमा घातलेल्या एका शिक्षकाची तालिबानी मंडळींनी हत्या केली. तालिबानींच्या या अतिरेकाला सर्वसामान्य मुस्लिम जनताही कंटाळून गेली असली तरी त्यांच्या दहशतीमुळे गप्प आहे. हिंदू समाजात गेल्या काही वर्षांमध्ये अशा अतिरेकी प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत आणि या प्रवृत्तीही देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दहशतवाद निर्माण करू लागल्या आहेत. हिंदू धर्माच्या संरक्षणाचे काम आपल्याच शिरावर आहे आणि त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले ऐकायलाच हवे, अशी त्यांची भूमिका असते. तालिबानीसुद्धा हीच भूमिका घेत असतात.
ख्रिस्ती मिशनऱ्यांबद्दल तक्रारी असल्या तर कायद्याने कारवाई करणे शक्य आहे. मात्र या प्रवृत्ती मारहाणीचा वा प्रसंगी ठार मारण्याचा मार्ग अवलंबू लागल्या आहेत. तरुण मुलींनी जीन्स, फ्रॉक वा स्कर्ट घालू नयेत, साड्याच नेसाव्यात, असे म्हणणारी ही मंडळी कोणत्या युगात राहतात, कोणास ठाऊक. एकीकडे स्त्री ही मातेसमान आहे, असे म्हणायचे आणि मुलींना मारहाण करत त्यांचे कपडे फाडायचे, हे हिंदूच नव्हे, तर कोणत्याच धर्मात बसू शकत नाही. पण मर्यादापुरुषोत्तम श्ाीरामांच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या 'कार्यर्कत्यां'नी मंगलोरच्या पबमध्ये नेमके हेच केले. त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. हा धुडगूस घालताना 'जय श्ाीराम', 'बजरंग बली की जय' अशा घोषणा देणे यामुळेच हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकारामुळे तिथे गेलेल्या अनेक तरुणींना मोठा मानसिक धक्का बसला असून, त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागेल. याच संघटनेच्या काही कार्यर्कत्यांनी शनिवारी रात्री एका घरात घुसून तिथे चाललेली पाटीर्ही उधळून लावली. एवढे सारे झाल्यावर या संघटनेच्या प्रमुखाने त्याचे समर्थन केले. तोकडे कपडे घालून चालणारा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्याने दिला आहे. पण धर्माच्या नावावर इतरांच्या आयुष्याशी खेळण्याचा वा दुसऱ्यांवर नैतिकता लादण्याचा अधिकार या संघटनेला नाही. एखादे वर्तन समाजहिताला बाधक असेल, तर त्याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. त्यांचाच आश्ाय घेतला गेला पाहिजे.
मंगलोरनंतर कर्नाटकमधील अन्य शहरांत आणि मग इतर राज्यांतही हे लोण पसरू शकेल. तसे होणार नाही, याची काळजी शासन आणि पोलिसांनी घ्यायला हवी. त्यासाठी अशा संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावरच बंधने आणणे आवश्यक आहे. केंद सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनी मंगलोरमधील प्रकारांची गंभीर दखल घेतली आहेच. पण समाजानेही भीती न बाळगता भारतातील तालिबानी प्रवृत्तींचे आदेश, फर्मान वा ते घालू पाहत असलेले निर्बंध उधळून लावायला हवेत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय ब्राह्माण संमेलनातही ब्राह्माणांनी जानवे आणि धोतर घातलेच पाहिजे, स्नानसंध्या करायलाच हवी, स्त्रियांनी साडीच नेसायला हवी, अशी भूमिका मांडली गेली. हे सर्व न करताही एखादी व्यक्ती ब्राह्माण असू शकते, असे मांडणाऱ्या लेखिकेस जबरदस्तीने माफी मागायला लावण्यात आली. अशा प्रकारची वैचारिक असहिष्णुता समाजाच्या हिताची नाही. स्वत:ला प्रगत मानणाऱ्या वर्गाने तरी यापासून दूर राहिले पाहिजे.

No comments: