Friday, 13 February 2009

आरक्षण न मिळाल्यास बुलेट नव्हे, बॅलेट वापरू -अनंत चोंदे

उस्मानाबाद - शिवजयंतीच्या आधी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर आगामी निवडणुकांत मराठा समाज सत्ता परिवर्तन करून दाखवील. आम्ही आरक्षणासाठी बुलेट नव्हे, तर बॅलेट वापरू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला.
उस्मानाबाद जिल्हा मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या वेळी श्री. चोंदे बोलत होते. बार्शी नाक्‍यापासून घोषणा देत निघालेल्या या मोर्चात तरुण कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली जीप होती. डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे; पण बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे आत्महत्या कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांत मराठाच अधिक आहेत. जगाचा पोशिंदा असलेला समाज सुरक्षित राहू शकत नसेल तर त्यांच्यासाठी आरक्षण असलेच पाहिजे. मराठा समाजाने गेल्या 60 वर्षांमध्ये जात म्हणून सरकारकडे काहीच मागितलेले नाही; परंतु आता आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. राजकारणामुळेच मराठा समाजाचे तुकडे झाले आहेत; पण यापुढे मराठा समाजातील पुढाऱ्यांनी झेंडा कोणाचाही हाती घेतला तरी सोबत तांडा मात्र मराठ्यांचा ठेवला पाहिजे. सध्या विधानसभेत 113 मराठा आमदार आहेत; पण ते पक्षांचे प्रतिनिधित्व करतात, जातीचे नव्हे. ही बाब लक्षात घेऊन मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीपूर्वी मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले नाही तर येत्या निवडणुकांत बुलेट नव्हे, तर बॅलेटचा वापर करून सत्ता बदल केला पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, शिवसेनेचे आमदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष सौ. सिंधूताई मोरे, लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांची भाषणे झाली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.या मोर्चात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके, प्रा. चंद्रजित जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संपतराव डोके, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पडवळ, डी. आर. कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, राजाभाऊ मुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबा पाटील, सभापती अण्णासाहेब देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन बागल, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे मुकुंद सस्ते आदींसह जिल्ह्यातून आलेले तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
आता लक्ष्य शरद पवारांचे घर
महाराष्ट्रातील आघाडी सरकारची काडीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय हालत नाही, हे लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा निर्णय लवकर व्हावा, या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या कधीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरात स्वतःला कोंडून घेतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अनंत चोंदे यांनी या वेळी दिला.

No comments: