Saturday 11 October 2008

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते - डॉ. जयसिंगराव पवार, दैनिक सकाळ

कोल्हापूर, ता. ११ - दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते, असा खुलासा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक नव्हते, असे डॉ. वसंतराव मोरे यांनीही यावेळी स्पष्ट केले.
शिवरायांचे गुरू कोण, हा विषय काही दिवसांपासून गाजतो आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा क्रीडा पुरस्कार तहकूब केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर खुलासा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरू किंवा पालक अशा प्रकारची प्रतिमा समाजात रूढ झाली आहे. महाराजांवर लिहिलेल्या बखरी आणि त्या आधारे लिहिलेले इतिहास ग्रंथ कारणीभूत आहेत. सभासद बखर सोडल्यास अन्य सर्व बखरी पेशवेकालीन आहेत. काही बखरी महाराजांच्या निधनानंतर शे-सव्वाशे, तर काही पावणेदोनशे वर्षांनी लिहिल्या आहेत. त्यांचे लिखाण ऐकीव कथांवर आधारित असते. शिवकालीन सभासद बखरीत दादोजी हे शिवरायांचे शिक्षक किंवा गुरू होते, असा निर्देश नाही. इतिहास संशोधनात समकालीन कागदपत्रांना खरे महत्त्व असते.
दादोजींचा शहाजीराजेंशी १६३३ पासून १६४७ या काळात संबंध आला. त्या काळातील उपलब्ध कागदपत्रे (आदिलशाही फर्मानात) दादोजींचा उल्लेख सुभेदार म्हणून, तसेच शहाजीराजांच्या जहागिरीचा मुतालिक (कारभारी) म्हणून आला आहे.'' ते म्हणाले, ""इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर व गजानन मेहेंदळे यांनी पुरावे असल्याचा दावा केला आहे; पण ते सादर केले नाहीत, कारण त्यांच्याकडे एकही समकालीन पुरावा नाही. समकालीन असलेल्या कवी परमानंदांचे शिवभारत, जेधे करिना, आदिलशाही फर्माने, महजरासारख्या कागदपत्रांत दादोजींचा उल्लेख शिवरायांचे गुरू म्हणून आलेला नाही.'' मेहेंदळे चिकित्सक अभ्यासक आहेत. त्यांच्या शिवचरित्रात दादोजींचा उल्लेख गुरू म्हणून कोठेही आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश शिपूरकर, डॉ. विजयराव शिंदे, शामराव खाडे, सौ. वसुधा पवार, मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.

No comments: