Thursday 20 November 2008

ए. टी. एस. ने लावला मोका

मुंबई, ता. २० - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) कारवाई करण्यात आल्याची माहिती या पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास करताना एटीएसवर कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मालेगाव येथे २९ सप्टेंबरला मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले, तर ८० जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, श्‍यामलाल साहू, शिवनारायण कालसांगरा, अजय राहिरकर, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दहा जणांना अटक केली. "अभिनव भारत' आणि "जय वंदेमातरम्‌' संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींवर सुरुवातीला भारतीय दंड विधान कलमाखालील कायद्यांखाली कारवाई करण्यात आली होती. अटक आरोपींतील काहींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर आज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोका) खाली कारवाई करण्यात आली. मोका कायद्यातील कलम-३ च्या उपकलम सी-१,२ व ४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू आहे. मोका कारवाईनंतर ही सुनावणी मुंबईतील "मोका' न्यायालयात होणार आहे. माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या सुधाकर चतुर्वेदी या आरोपीची एटीएसने आज सायंकाळी कस्टडी घेतली असून, याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या अकरा होणार असल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. या प्रकरणातील आरोपींच्या कारवाया देशातील विविध राज्यांत सुरू होत्या. त्यांच्याशी संबंधित काही साक्षीदारांचे जबाबही एटीएसने लिहून घेतले आहेत. या आरोपींना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचादेखील तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा दडपण आपल्यावर नाही. संपूर्ण तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. तपासावर आक्षेप घेत कोणी जनहित याचिका दाखल केल्या असतील, तर आपल्याला त्याची माहिती नाही. याप्रकरणी आपण न्यायालयाला उत्तरदायित्व असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीच्या चौकशीत "समझोता एक्‍स्प्रेस'मधील बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला होता. मात्र या प्रकरणाची खातरजमा सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी यापूर्वीच सांगितले आहे. एटीएसने सध्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावर लक्ष्य केंद्रित केले असून, अन्य स्फोटांबाबतची माहिती आवश्‍यकतेनुसार तपासयंत्रणांना दिली जाईल, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला कोठडीत होत असलेल्या मारहाणीचा आरोप खोटा आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य आरोपींच्या झालेल्या नार्को चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांकडे आला नसल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. स्फोटाच्या तपासासंबंधी प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या बातम्या अनेकदा अटकळींवर आधारित असतात. या प्रकरणातील विविध पैलू तपास पूर्ण होण्याआधी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघडकीस आणल्यास ते तपासाला घातक ठरण्याची शक्‍यताही करकरे यांनी या वेळी वर्तविली.
-----------------------------------------------------
लेफ्टनंट पुरोहितच "अभिनव भारत'चा संस्थापक मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसने अटक केलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानेच फेब्रुवारी २००६ मध्ये "अभिनव भारत' संघटनेची स्थापना केल्याची माहिती एटीएसचे सह आयुक्त करकरे यांनी या वेळी दिली. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना पुरोहित याने मिथून चक्रवर्ती नावाने प्रशिक्षण दिल्याची बाब तपासाधिन असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले.
-----------------------------------------------------
राकेश धावडेवरील गुन्हे "मोक्का'साठी ठरले अनुकूल मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेला आरोपी राकेश धावडे याचा परभणी व जालना येथील स्फोटात सहभाग सिद्ध झाला आहे. त्याच्याविरुद्ध परभणीच्या पूर्णा येथील मेहराजूल उलुम मदरशाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ननलपेठ पोलिस ठाणे; तर जुना जालनाच्या मालीपुरा येथील जामा मशिदीजवळ स्फोट घडविल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मालेगाव स्फोटातील काही आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असले, तरी राकेश धावडेवर दाखल असलेले गुन्हे मालेगाव स्फोटातील आरोपींना मोक्का लावण्याला महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते.
-------------------------------------------------------------
"रामजी'चा शोध सुरू मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी "रामजी' या आरोपीचा शोध सुरू आहे. तो या स्फोटातील महत्त्वपूर्ण आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात "भगवान' नावाच्या आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे येत असले, तरी या नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे अथवा नाही याचाही शोध सुरू असल्याचे हा अधिकारी म्हणाला. -------------------------------------------------------------

1 comment:

प्रकाश पोळ said...

दै. लोकमत दी १९/१२/२००८
करकरेंचा मृत्यु आतंक्वाद्याकडूनच झाला याबद्दल माजी मुख्यमंत्री अंतुले यानि संशय व्यक्त केला आहे. मालेगाव स्फोटाच्या पार्श्वभूमीवर यामागे आणखी काही सत्य असू शकेल काय?