Tuesday 25 November 2008

संभाजी ब्रिगेडचे नांदेडला पाचवे राष्ट्रीय अधिवेशन - वैभव तळेकर

लातूर, ता. २५ - संभाजी ब्रिगेडचे पाचवे राष्ट्रीय महाअधिवेशन ३०नोव्हेंबरला नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर यांनी दिली. या अधिवेशनाचे उद्‌घाटन कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चौंदे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नांदेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे हे आहेत. या अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात संघटनचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे "संभाजी ब्रिगेड ः मराठा अस्मितेचा लोकलढा' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी मनोज आखरे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव शृंगारे, गुणवंत आठरे, हेमंत गौरकर उपस्थित राहणार आहेत.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे "सामाजिक, सांस्कृतिक दहशतवाद आणि आजचा युवक' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रवीण गायकवाड राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाजरे, सोमनाथ नवले, मनोज वाघ, विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत. शिवराज महाराज पंढरपूरकर यांचे ""तुकोबांचे "वार'करी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदीप साळुंके राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. बालाजी वाघमारे, रणजित कारेगावकर, राजेंद्र आढाव, माधव पावडे उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व सुरेश हावरे यांचा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चौंदे राहणार आहेत. तरी या अधिवेशनाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. तळेकर, कार्याध्यक्ष गोविंद सिरसाठ, ऍड. धनंजय भिसे, आकाश भोसले, महेश अलगुडे, शाहूराज पाटील, किरण बिडवे, बाळासाहेब जाधव , गोविंद पाटील यांनी केले आहे.

No comments: