Thursday 11 September 2008

आधुनिक त्रिमूर्ती


माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली त्याच्या कार्य-स्मरणाची असते. भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वांत छत्रपती शिवराय , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. या तिघांच्या नेतृत्वात , कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं ? हे तिघेही लोकनेते होते. तथापि , त्यांच्या नेतृत्वाला निश्चित विचारतत्त्वांची बैठक होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागतात आणि तत्त्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत , असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. परंतु हे तीन लोकनेते या इतिहासास अपवाद ठरले , म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक झाले.

छत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याची नव्हे , तर स्वराज्याची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्याचा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूतीर्ंच्या स्वराज्य , स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांत आहे. या तीन तत्त्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली भारतीय लोकशाही हेच या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे ; परंतु हेच कार्य विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. आज या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यात फार मोठं वैचारिक अंतर आहे. ते त्यांच्या कार्याचा घोर अपमान करणारे आहे. ' डॉ. आंबेडकरांचा विजय असो ' म्हणताना ' जय शिवाजी! जय गांधीजी ' असाही गजर व्हायलाच हवा. तसंच ' शिवाजीमहाराज की जय ' चा नारा लगावताना महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचाही जयजयकार करण्यास विसरू नये. या तिघांचं जीवनकार्य हे राष्ट्रउभारणीचं शास्त्र आहे. तथापि , त्याचा संस्कार करवून घेण्याऐवजी त्यांची नावं शस्त्रासारखी एकमेकांविरोधात वापरली जात आहेत. महात्माजी काँग्रेसवाल्यांचे , डॉ. आंबेडकर दलितांचे आणि शिवराय दोघांनाही विरोध करणाऱ्यांचे ; अशी या विभागणी झालीय. ती राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यामुळे समाजात अहंकार बळावतोय , मूर्खपणा वाढतोय.

महात्माजी आणि आंबेडकर या दोघांनीही शिवरायांच्या समताधिष्ठित राज्यपद्धतीला आदर्श मानलं आहे. खेडे स्वयंपूर्ण व्हावे , ग्रामविकास व्हावा या गांधीविचारांची बीजे शिवशाहीत आहेत. शिवरायांच्या भूमीत कार्यर्कत्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजी साबरमतीचा आश्रम बंद करून र्वध्याला आले. काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारताच ' शिवाजीमहाराज की जय! ' म्हणत भारतभर फिरले. महात्माजींना आंबेडकरांच्या कार्याबद्दलही आस्था होती. दोघांत वैचारिक मतभेद होते. कारण दोघांचे मार्ग भिन्न होते. परंतु उद्दिष्ट एकच- मानवतेचं रक्षण व मानवतावादाला बढावा देणे हेच असल्यामुळे उभयतांना परस्परांबद्दल आस्था होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर म्हणाले , ' आज मी समाधानी आहे. गांधींना दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. ' डॉ. आंबेडकरांच्या नियोजित ग्रंथलेखनात महात्मा फुले यांच्या चरित्राप्रमाणे महात्मा गांधींच्याही चरित्राचा समावेश होता. ते जाहीरपणे म्हणाले होते , ' माझ्यापेक्षा गांधींना अधिक कोण ओळखतं ? म्हणून मीच त्यांचं चरित्र लिहिणार आहे. ' गांधीजींच्या जिवाचीही चिंता आंबेडकरांना होती. त्यांनी गांधींना अनेकदा सावधही केलं होतं. ते गांधींना म्हणालेही होते , ' एक वैश्य , बनिया ब्राह्माणांसकट सर्वांचे नेतृत्व करतो , ही गोष्ट चातुर्वणीर् ब्राह्माणांना माहीत नाही , असं समजू नका ; पण एक गोष्ट तेवढीच खरी की , जोवर तुम्ही ब्राह्माणांचे हितसंबंध जोपासता तोवर तुमच्या महात्मापणाला धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही ब्राह्माणांच्या हिताला बाधा आणाल , तेव्हा तुमची काय गत होईल , ते मी सांगण्याची गरज नाही. ' हे शब्द नथुरामने खरे केले.

गांधींबद्दल आंबेडकरांच्या मनात असलेली ही आस्था त्यांच्या अनुयायांनीही आपल्याला रुजवायला पाहिजे होती. सत्तास्वार्थासाठी दलित नेत्यांकरवी दलित समाजाला वापरणारी काँग्रेस वाईट , म्हणून काँग्रेस ज्यांना आपल्या मोठेपणासाठी वापरते ते गांधीजीही वाईट , हा अविचार आंबेडकरांना मानणाऱ्यांनी झटकला पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दुरावा असण्याचं कारणच नव्हतं. कारण सामाजिक समानतेच्या बाबतीत शिवाजी महाराज काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी महार-मांग या शूर जातींतील वीरांना गडकरी , सैन्याधिकारी पदी नेमून त्यांचा सन्मान केला होता. शिवशाही स्थापताना त्यांनी जातीचा अधिकार मोडून काढला. गुणांना , कर्तबगारीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच वाई परगण्यात नागेवाडीची पाटीलकी नागनाक महाराला मिळाली. अष्टप्रधान मंडळात वेगवेगळ्या जातींच्या मंडळींची सारख्याच उंचीची बैठक पाहून देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाराज कडाडले , ' शिवशाहीत सर्वच बैठका एकाच उंचीच्या असतील , एकच फक्त त्यापेक्षा उंच असेल. ते जनताजनार्दनाने दिलेलं राजसिंहासन. ' रयतेचा राजा असा शिवरायांचा लौकिक होता. जनतेच्या सुख-दु:खांची त्यांना जाण होती , तसंच आपल्या जबाबदारीचंही भान होतं. लोकनेते म्हणवून घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बरेच किल्ले जिंकले , नवे किल्ले बांधले. पण तिथे त्यांनी आपल्या नावाचा शिलालेख नाही बसवला. त्यांचा पुतळाही त्यांच्या निधनानंतर अडीचशे वर्षांनी आकारास आला. याउलट स. का. पाटलांसारख्यांनी आपल्या हयातीतच ब्राँझचा टोलेजंग पुतळा तयार करवून मुंबईत ठाकूरद्वारच्या उद्यानात बसवला. स. का. पाटील जाऊन पंचवीसेक वर्षंच झालीत , पण त्यांचं नाव विस्मरणात गेलेय. मात्र शिवरायांंचा पराक्रम प्रथम कळतो आणि त्यांचा भव्य पुतळा पाहूनही त्यांचा पराक्रम श्रेष्ठच राहतो. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या पराक्रमाची थोरवीही अशीच आहे.

ही माणसं दगडाच्या इतिहासासाठी नव्हती. ही दगडातून इतिहास निर्माण करणारी माणसं होती. ती वाटून घेण्यासाठी नाहीत. संपन्न भविष्याची वाट दाखवण्यासाठी आहेत. त्या तिघांपुढे एकाच वेळी नतमस्तक होणं , हीच खरी त्यांना आदरांजली आहे , त्यांच्या विचारतत्त्वाची आचारक्रांती आहे.

-कलेक्शन

No comments: